मानखुर्द : महाराष्ट्रनगर येथे रस्त्यावर शॉर्मा खाल्याने एकाचा मृत्यू, अनेकांना विषबाधा | पुढारी

मानखुर्द : महाराष्ट्रनगर येथे रस्त्यावर शॉर्मा खाल्याने एकाचा मृत्यू, अनेकांना विषबाधा

मानखुर्द; पुढारी वृत्तसेवा : रस्त्यावर मिळणारा चिकन शॉर्मा खाल्ल्याने मानखुर्दमध्ये अनेकांना विषबाधा झाला. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. प्रथमेश भोकसे (वय 19) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो महाराष्ट्र नगरचा रहिवासी होता.

मानखुर्द येथील महाराष्ट्रनगरच्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे खाद्य पदार्थ विक्री होत आहेत. यातीलच आनंद कांबळे व मोहम्मद अहमद रेजा शेख यांचा शॉर्मा विक्रीची गाडी आहे. याठिकाणी प्रथमेशसह परिसरातील अनेकांनी शॉर्मा खाल्ला होता. यामुळे प्रथमेशला मोठ्या प्रमाणात उलटी आणि पोट दुखीचा त्रास होऊ लागला. यामुळे त्याला जवळील रुग्णालयात नेवून उपचार केले. यावेळी त्याला तात्पुरते बरे वाटले.

मात्र, पुन्हा त्याला दुसऱ्या दिवशी त्रास होऊ लागल्याने केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याच दरम्यान महाराष्ट्रनगरमध्ये याच गाडीवर शॉर्मा खाल्ल्याने त्रास होणाऱ्यांच्या तक्रारी येऊ लागल्या. वेगवेगळ्या ठिकाणी दहा ते बारा लोकांनी उपचारासाठी धाव घेतली. यापैकी चार जणांची माहिती पोलिसांना मिळाली.

मंगळवार (दि ७) रोजी सकाळी उपचार सुरु असताना प्रथमेशची तब्येत खालावली यात त्याचा मृत्यू झाला. तर चार जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.या प्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी रस्त्यावर निकृष्ट शॉर्मा बनवून विकणाऱ्या आनंद कांबळे आणि मोहम्मद अहमद रेजा शेख यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. मानखुर्द महाराष्ट्रनगरच्या रस्त्यावर असे निकृष्ट दर्जाचे अन्न पदार्थ मोठ्या प्रमाणात बनविले जातात. या अनधिकृत खाद्य पदार्थ गाड्या दादगिरी करुन हप्ते घेऊन चालविले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत असून यावर कठोर कारवाई ची मागणी होत आहे.

Back to top button