बंजारा समाजाचा अनोखा होळी उत्सव | पुढारी

बंजारा समाजाचा अनोखा होळी उत्सव

आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) : पुढारी वृत्तसेवा

काकी ये दीदी रिस मत कर जो होळी बोलच ये भांड, म्हणजे आजी काकी तुम्ही रागवू नका होळीच आम्हाला भांडायला सांगते असा याचा अर्थ होतो. त्याप्रमाणे बंजारा समाजामध्ये होळीला दिवाळीला व नागपंचमीला घरच्या पितरांना पूजले जाते व होळीनिमित्त सकाळी उठून वळवट व भात करून शुद्ध तुपामध्ये अग्नीला देऊन पूजन करतात. त्यास ‘आपकार’ असे म्हणतात. याचा अर्थ चुलीमध्ये अग्नीला घास देणे असा होतो. बंजारा समाजामध्ये होळी विशेष महत्त्वाची मानली जाते.

बंजारा समाजामध्ये होळी सण पंधरा दिवस राहिला असताना प्रत्येक ताणड्यामध्ये पुरुष व स्त्रिया होळी खेळायला सुरुवात करतात. महिला व पुरूष वेगवेगळे ताल धरून नाचतात.

पंचवीस वर्षांपूर्वी होळी सणानिमित्त गावच्या वाटेवर अथवा इतर गावांमध्ये जाऊन गेर मागतात. म्हणजे पैसे मागतात पण आता ही प्रथा हळूहळू लोप पावत आहे. गावामध्येच गेर मागतात. नवीन मुलगा जन्माला आल्यास त्याचा शोध घेतात त्याला धुंड असे म्हणतात, अशा मुलांचे घर शोधून त्याच्या घरासमोर जाऊन होळी खेळतात व आनंदोत्सव साजरा करतात. त्यानंतर त्या मुलाचे वडील सर्वांना जेवण देतो.

तसेच या समाजात होळीपर्यंत मागच्या वर्षी काळात ज्या घराच्या पुरुष अथवा लोक मरण पावले असतील, त्या घरासमोर जाऊन गाणे म्हणून होळी खेळतात म्हणजे त्या घरच्या माणसांचे सांत्वन करतात.

गावोगावी होळी सायंकाळी सात वाजता पेटविली जाते. पण बंजारा समाजामध्ये होळी सकाळी चार वाजता पेटविली जाते. विशेष म्हणजे गावातील पेटविलेल्या होळीची विस्तव घेऊन मुले रात्री घरी जातात व त्या विस्ताराने सकाळी चार वाजता होळी पेटवली जाते. या समाजामध्ये सकाळच्या शुक्राची चांदणी निघते त्यावेळेस होळी जाळली जाते.

सार्वजनिक ठिकाणीचे एरंडीच्या झाडाला आग लावली जाते. यावेळी महिला मुलांना आग लावू देत नाही. त्यावेळी मुले एरंडीची दांडी घेऊन पळतात, त्यास दांडी काढणे म्हणतात. होळीच्या आजूबाजूस बायका-मुले होळी खेळत गाणे म्हणतात. त्यावेळी चे गाणे म्हणजे होळी आई होळी डगर चालिये या गाण्याने सणाची सांगता करतात.

असे म्हणतात की, ज्याप्रमाणे गणपती उत्सवात गणरायाला निरोप देताना काही गाणे म्हणतात. त्याप्रमाणे होळी आई होळी डगर चालिये म्हणजे होळी चालल्यानंतर अखेरीस हे गाणे म्हणतात.

Back to top button