दिशा सॅलियान प्रकरण : नारायण राणे, नितेश राणे यांना जामीन मंजूर | पुढारी

दिशा सॅलियान प्रकरण : नारायण राणे, नितेश राणे यांना जामीन मंजूर

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिशा सॅलियान प्रकरणी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) आणि त्यांचे पुत्र भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी राणे पिता-पुत्रांना आज (बुधवार) अटी, शर्थीसह अटकपूर्व जामीन मंजूर केला असून दिंडोशी सत्र न्यायालयाने त्यांना मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने प्रत्येकी १५ हजारांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला. राणे पितापुत्रानी तपासावर कोणत्याही प्रकारे दबाव आणू नये, तसेच साक्षी पुराव्यांशी छेडछाड करू नये, असे निर्देशही दिले आहेत .

याबाबत प्रतिक्रिया देताना नितेश राणे म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आमच्या विरोधात षडयंत्र रचले होते. आमच्यावर दबाव आणला जात होता. परंतु लोकशाहीत अन्यायावर आवाज उठविण्याचा अधिकार न्यायालयाच्या या निर्णयामुळे अबाधित राहिला आहे. ज्या ठिकाणी अन्याय होईल, तेथे आम्ही यापुढे अशाच आवाज उठवत राहू, असे राणे यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. ते पुढे म्हणाले की, काही अटी शर्थीसह जामीन मिळालेला आहे. अंतिम निर्णय अद्याप न्यायालयाने दिलेला नाही. परंतु यापुढे आम्ही आमचे कर्तव्य बजावत राहू, असेही राणे म्हणाले.

दरम्यान, दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची व्यवस्थापक दिशा सॅलियानने ९ जून २०२० रोजी आत्महत्या केली होती. त्यानंतर तिच्या मृत्यू प्रकरणी आक्षेपार्ह व बदनामीकारक विधाने नारायण राणे यांनी केली होती. नारायण राणे (narayan rane) यांनी पत्रकार परिषदेत काही विधाने करत दिशा सॅलियानची बदनामी केल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांनी केला होता. याविरोधात त्यांनी महिला आयोगाकडे तक्रार केली होती. तसेच या प्रकरणी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही नारायण राणेंविरोधात महिला आयोगाकडे तक्रार केली होती. तसेच पेडणेकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना लिहिलेल्या पत्रात दिशा सॅलियान प्रकरणावरून नारायण राणे यांनी भाष्य केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर राणे पितापुत्राविरोधात मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी राणे  पितापुत्रांना जबाब नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे समन्सही बजावण्यात आले होते. यानंतर राणे पितापुत्रांनी दिंडोशी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्जही केला होता. त्या अर्जावर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. यावर आज न्यायालयाने निर्णय देत जामीन मंजूर केला आहे.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : भारतात स्त्रियांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज : डॉ. निहारिका प्रभू |

Back to top button