

पुणे : पुढारी वृत्तसेवा
गुन्हेगार कितीही शातिर असला हरी तो पोलिसाच्या नजरेतून सुटू शकत नाही. दारु पिल्यानंतर उसने घेतलेल्या पैशाच्या वादातून मित्रानेच मित्राचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना सोमवारी रात्री साडेबाराच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस भवनाच्या समोरील डेंगळे ब्रीजजवळ घडली होती. त्यानंतर आरोपीने तेथून पळ काढला होता. मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास शिवाजीनगर पोलिसांना अज्ञात मृतदेहाची माहिती मिळाली होती. त्यानंतर बारा तासात सुतावरून स्वर्ग गाठत पोलिसांनी खूनाचा छडा लावत आरोपीला अटक केली.
केवळ एका शर्टावर ऊन पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला आहे. बबलू उर्फ अबदुल्ला सरदार (वय.35,रा. बुधवार पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर सद्दाम उर्फ ईस्माईल शेख (वय.25,रा. बुधवार पेठ) याचा खून झाला आहे. सरदार याच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सद्दाम व बबलू हे एकमेकांच्या ओळखीचे असून, मित्र आहेत. दोघेही मुळचे पश्चिम बंगाल येथील असून, बुधवार पेठेत राहतात. दोन दिवसापुर्वी सद्दाम याने बबलू याच्याकडून हातउसणे पैसे घेतले होते. सोमवारी सायंकाळी बबलूने त्याच्याकडे पैशाची मागणी केली. तेथून दोघे दारू पिण्यासाठी ढेंगळे पुलाखाली आहे. तेथे त्यांच्यात पैशावरून वाद झाला. त्यावेळी बबलूने सद्दामच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. त्यानंतर बबलू तेथून पळून गेला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून आरोपीला अटक केली. तपास पथकाचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक अतुल क्षिरसागर यांच्या पथकाने कौशल्यपुर्वक तपास करून आरोपीला बेेड्या ठोकल्या.
सद्दामचा खून केल्यानंतर बबलू तेथून पसार झाला होता. पोलिसांना घटनास्थळी रक्ताने माखलेला एक शर्ट मिळाला होता. मृतदेहाची ओळख पटविण्यापासून ते खुन्याला पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते. सीसीटीव्ही चित्रिकरण तपासताना सद्दाम व बबलू बुधवारपेठेत एकत्र फिरत असताना दिसले. त्यानुसार पोलिस बबलूच्या घरी पोहचले. बबलूला ताब्यात घेतले. पोलिसांनी चौकशी केली असता, तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. मात्र रक्ताने माखलेला शर्ट बबलूने घातला असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्याला शर्ट बबात विचारणा केली तेव्हा देखील तो खोटे बोलला. मात्र पोलिसांनी कॅमेर्यातील त्याचा शर्ट व रक्ताने माखलेला तो शर्ट दाखवताच त्याने खूनाची कबुली दिली.