सुरगाणा : युवकांकडे सापडले गावठी कट्टे, जिवंत काडतुसे, कोयता ; तिघांच्या आवळल्या मुसक्या | पुढारी

सुरगाणा : युवकांकडे सापडले गावठी कट्टे, जिवंत काडतुसे, कोयता ; तिघांच्या आवळल्या मुसक्या

सुरगाणा : प्रतिनिधी :  प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला तालुक्यातील ३ युवकांकडे
०३ देशी बनावटीचे पिस्टल, ०१ एअरगन, ०१ चॉपर व ०६ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांना गुप्त माहिती मिळाली होती. पाटील यांनी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, स्थानिक गुन्हे शाखा यांना सूचना करुन कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस पथकाने  बोरगाव ते सुरगाणा रस्त्यावर चिराई स्टॉप त्रिफुली येथे नागशेवडी गावच्या शिवार परिसरात छापा टाकून अवैधरित्या घातक अग्निशस्त्र बाळगणाऱ्या ३ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत अंकेश सुरेश एखंडे, वय-२९ वर्षे, रा-घोडाबे, श्यामराव नामदेव पवार, वय-२४ वर्षे, रा-वांजुळपाडा, आकाश सुनिल भगरे, वय २२ वर्षे, रा सुरगाणा शहर या तिघांच्या ताब्यातून ०३ देशी बनावटीचे पिस्टल (गावठी कट्टे) व ०३ जिवंत काडतुसे तसेच ०१ एअरगन, ०१ चॉपर, ०१ कोयता, ०६ मोबाईल व ०१ टोयाटो कोरोला वाहन असे घातक अग्निशस्त्र हस्तगत करण्यात आले.

या तिघांविरुद्ध  अवैधरित्या घातक अग्निशस्त्र बाळगल्या प्रकरणी सुरगाणा पोलीस ठाण्यात हत्यार कायदा कलम ३/२५, ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पथक पुढील तपास करीत आहे. नाशिक ग्रामीणचे  पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पोनि हेमंत पाटील, सहायक पोलिस निरिक्षक रामेश्वर मोताळे, सहापोउपनि नाना शिरोळे, पोलिस हवालदार गोरक्षनाथ सवंत्सकर, किशोर खराटे, प्रविण सानप, पोलिस नाईक, विश्वनाथ काकड यांनी ही धडाकेबाज कारवाई केली.

हेही वाचा :

Back to top button