Lok Sabha Election 2024 : राहुल गांधी यांचा ४ जूननंतर सरकार बनविण्याचा दावा | पुढारी

Lok Sabha Election 2024 : राहुल गांधी यांचा ४ जूननंतर सरकार बनविण्याचा दावा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या ३ टप्प्यातील मतदानाचा कल आणि भाजपच्या आक्रमणाचे बदलते स्वरूप लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातून सत्ता जाईल, असा विश्वास काँग्रेसला वाटू लागला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे ४ जूननंतर आम्हीच सरकार बनविणार असल्याचा दावा केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातून ही निवडणूक निसटत चालली आहे. देशाच्या पंतप्रधानपदी आपण कायम राहणार नाही, याची जाणीव त्यांना झाली आहे. त्यामुळेच पुढील चार-पाच दिवसांत मोदी जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यासाठी ते काहीतरी नाटक करतील. मात्र, तुम्ही लक्ष विचलित होऊ देऊ नका, असे आवाहन राहुल गांधी यांनी सोशल मीडियावरील एक्सवर पोस्ट केलेल्या व्हिडिओ संदेशातून केले आहे. (Lok Sabha Election 2024)

देशात बेरोजगारी हा सर्वात मोठा मुद्दा आहे. मोदी यांनी दरवर्षी २ कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, हे आश्वासन खोटे ठरले. नोटबंदी लागू करून देशातील सर्व कामे उद्योगपती अदानी यांना दिली. आम्ही तरुणांना रोजगार देण्यासाठी भरती योजना राबविणार आहोत. ४ जूननंतर इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होईल, असा आम्हाला विश्वास आहे.

सरकार आल्यावर आम्ही येत्या १५ ऑगस्टपर्यंत ३० लाख रिक्त पदे भरण्याचे काम सुरू करणार आहोत, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदी यांच्या कुठल्याही खोट्या प्रचाराला बळी पडू नका, आपल्या मुद्द्यांवर ठाम रहा, असे आवाहन राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले आहे. इंडियाचे ऐका, द्वेषाचे राजकारण स्वीकारू नका, असे आवाहनही राहुल गांधी यांनी या संदेशातून केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अदानी -अंबानी यांच्यावर राहुल गांधी काहीच बोलत नसल्याचे सांगून काँग्रेसवर हल्ला चढवला होता. काँग्रेसला गप्प बसण्यासाठी टेम्पो भरून पैसे पोहोचलेत का?असा असा सवाल मोदी यांनी केला होता.

मोदी यांच्या हल्ल्यावर राहुल गांधी यांनी पलटवार करून या आरोपांची चौकशी करण्याचे आव्हान दिले आहे. आता तर ४ जूननंतर इंडिया आघाडी सरकार बनविणार असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केल्यामुळे देशातील राजकीय वातावरण बदलल्याची चर्चा सुरू आहे.

Back to top button