पंतप्रधान मोदींसह राहुल गांधींना खुल्या चर्चेचे निमंत्रण | पुढारी

पंतप्रधान मोदींसह राहुल गांधींना खुल्या चर्चेचे निमंत्रण

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : माजी न्यायमूर्ती मदन लोकूर आणि ए. पी. शाह तसेच वरिष्ठ पत्रकार एन. राम यांनी पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांना लोकसभा निवडणुकीवर खुल्या चर्चेसाठी गुरुवारी (दि.९) निमंत्रण दिले. ही चर्चा सार्वजनिक आणि निष्पक्षपाती असेल, असे पाठवण्यात आलेल्या निमंत्रणात म्हटले आहे. तसेच या सार्वजनिक चर्चेचे निमंत्रण स्वीकारण्याचे आवाहन दोन्ही नेत्यांना करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणूक मध्यावर आली आहे. यानिमित्ताने लोकशाहीची प्रक्रिया मजबूत करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मदन लोकूर, दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ए. पी. शाह आणि वरिष्ठ पत्रकार एन. राम यांनी हे निमंत्रण देशातील प्रमुख दोन नेत्यांना दिले आहे. या पत्रात तिघांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांना निःपक्षपातीपणे सार्वजनिक व्यासपीठावर आपले मत मांडण्याचे आवाहन केले आहे. यामुळे देशातील लोकशाही प्रक्रिया अधिक बळकट होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

एकीकडे आरक्षण, कलम ३७० आणि मालमत्ता पुनर्वितरण या मुद्द्यांवर बोलत आहेत. तर दुसरीकडे राहुल गांधी संविधानावर संभाव्य हल्ले, निवडणूक रोखे योजना आणि चीनच्या मुद्द्यांवर बोलत आहेत. मात्र यामधून जनतेला कोणतेही स्पष्ट व अर्थपूर्ण उत्तर मिळू शकले नसल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

जनतेचे प्रतिनिधी म्हणून दोन्ही नेत्यांशी चर्चा करु इच्छितो. या सार्वजनिक चर्चेसाठी स्थळ, वेळ आणि स्वरूप दोन्ही नेत्यांच्या सहमतीने ठरवले जाईल. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी चर्चेला उपस्थित राहू शकत नसतील तर दोन्ही नेत्यांनी त्यांचे प्रतिनिधी पाठवावे, असेही आवाहन या पत्रात करण्यात आले आहे.

हेही वाचा :

Back to top button