Solapur News : सोलापूर मार्गावरील रेल्वेगाड्या चार ते पाच तासांनी उशिरा | पुढारी

Solapur News : सोलापूर मार्गावरील रेल्वेगाड्या चार ते पाच तासांनी उशिरा

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : रेल्वे प्रशासनातर्फे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये प्रवाशांची गर्दी कमी व्हावी यासाठी समर स्पेशल सुपरफास्ट अतिरिक्त गाड्यांची सुरुवात केली आहे. दुसरीकडे नियमित धावणार्‍या अनेक रेल्वेंना पाच ते सहा तास उशीर होत आहे. मात्र, 22159 ही मुंबई-चेन्नई एक्स्प्रेस तब्बल 4 तास 30 मिनिटे उशिराने धावत आहे. (Solapur News)

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची धामधूम सुरु असल्यामुळे रेल्वेगाड्यांना प्रचंड गर्दी आहे. यातच रेल्वे प्रशासनाने रेल्वेचे एसी डबे वाढवले आहेत. सामान्य तसेच स्लीपर डब्यांची संख्या कमी केली आहे. यामुळे प्रवाशांना नाइलाजाने महाग तिकिटावर प्रवास करावा लागत आहे. रणरणत्या उन्हामध्ये गाड्या उशिराने धावत असल्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून त्यांचे पुढील नियोजन कोलमडत आहे.

सोलापूर रेल्वे स्थानकावर गाडी क्रमांक 22159 ही गाडी नियोजित वेळेपेक्षा तब्बल 4 तास 30 मिनिटे उशिराने येणार आहे. या गाडीने जाणार्‍या प्रवाशांनी तिकीट रद्द केले असून त्यांच्यासाठी पर्यायी गाडीची व्यवस्था केली आहे. मात्र, ऐन वेळेवर आवश्यक तिकीट मिळत नसल्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहे.

सोलापूरहुन तिरुपतीला देव दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांची संख्या मोठी आहे. तीन ते चार महिने आधीच पास काढून ठेवले जातात. गाड्या उशिराने धावत असल्याने नियोजित दर्शन मिळत नाही. या त्रासाला प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाने योग्य नियोजन करून गाड्या नियोजित वेळेत सोडाव्यात. अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. (Solapur News)

या आहेत उशिराने धावणार्‍या एक्सप्रेस गाड्या

18519 – विशाखापट्टणम-एलटीटी (6 तास)
11020 – भुवनेश्वर-मुंबई कोणार्क ( 2 तास 30 मिनिटे)
11302 – बंगळूरू-मुंबई उद्यान (15 मिनिटे)
09628 – सोलापूर -अजमेर साप्ताहिक (4 तास)
16340 – नागरकोईल-मुंबई (1 तास 30 मिनिटे)

डाऊन मार्गावरून उशिराने जाणार्‍या एक्सप्रेस गाड्या

11520 – एलटीटी – विशाखापट्टणम (3 तास 15 मिनिटे)
11301 – मुंबई – बंगळूरू उद्यान (1 तास 27 मिनिटे)
09627 – अजमेर – सोलापूर (5 तास 10 मिनिटे)

हेही वाचा : 

Back to top button