धुळे पुढारी वृत्तसेवा– युवकाच्या खुनाचा तपास करण्यासाठी शिरपूर तालुक्यातील भाटपुरे गावात पोहोचलेल्या पोलीस पथकावर जमावाने दगडफेक केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. शिरपूर तालुक्यात या महिन्यात ही सलग दगडफेकीची दुसरी घटना घडली आहे. मृत युवकाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दोन संशयितांविरोधात थाळनेर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांमध्ये मुलाच्या मेव्हण्याचाही समावेश आहे. दोन्ही संशयितांविरोधात थाळनेर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात तपास करीत आहेत.
दरम्यान खुनाची माहिती कळताच थाळनेर पोलिस तपासासाठी घटनास्थळी पोहचले. त्यावेळी ग्रामस्थांनी त्यांना संशयितांना अटक करण्याची मागणी केली. या कारणावरून जमाव कमालीचा संतप्त झाला. त्यामुळे जमावातील काही जणांनी जमावातून दगडफेक केली. त्यात पोलिस जीपच्या काचा फुटल्या. पोलिसांनाही दगडांचा तडाखा बसला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. सौम्य लाठीमार केला. उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली. यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा व पोलिसांनी गावात बंदोबस्त तैनात केला.
तर मृतदेहाची उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातलगांच्या ताब्यात देण्यात आला. भाटपुरा येथे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गावात शांतता असून बंदोबस्त कायम ठेवल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान शिरपूर तालुक्यात यापूर्वी आदिवासी तरुणाच्या मृत्यूप्रकरणी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चेकर्यांनी देखील पोलीस ठाण्यावर दगडफेक केली होती. यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिन्यापूर्वी घडलेल्या या घटनेनंतर पुन्हा पोलिसांवर जमावाचा होणे रोष व्यक्त केल्याची घटना घडली आहे .या संदर्भात देखील आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
हेही वाचा –