हिंगोली : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न | पुढारी

हिंगोली : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : सेनगाव तालुक्यातील (हिंगोली) दस्तनोंदणीमध्ये तुकडेबंदी कायद्याचा भंग करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी इंडियन ह्यूमन राइट्स ऑर्गनायझेशन संघटनेचे मिलिंद प्रधान यांनी बुधवारी (दि. २६) सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांना हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी धावपळ करून त्यांना पकडले.

सेनगाव तालुक्यामध्ये (हिंगोली) दस्त नोंदणी करताना तुकडेबंदी कायद्याचा भंग करण्यात आला असल्याचा आरोप इंडियन ह्यूमन राइट्स ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष मिलिंद प्रधान यांनी केला होता. यासंदर्भात त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे दि. १७ जानेवारी रोजी निवेदन सादर करून सेनगावच्या दुय्यम निबंधक कार्यालयाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. यासंदर्भात त्यांनी निवेदनात ज्याठिकाणी दस्तनोंदणी मध्ये अनियमितता झाली त्याबाबतची सविस्तर माहितीही निवेदनात नमूद केली होती. या प्रकरणात चौकशी न झाल्यास प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा प्रधान यांनी दिला होता.

मात्र त्यांनी दिलेल्या निवेदनावर संबंधित प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. त्यामुळे प्रधान यांनी बुधवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय (हिंगोली) गाठले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी पाच लिटरचा डिझेल भरलेला डबा अंगावर ओतुन घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.

दरम्यान हा प्रकार तेथे उपस्थित असलेले पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, शहर पोलिस ठाण्याचे जमादार संजय मार्के व इतर पोलिसांच्या लक्षात आला. पोलिसांनी तातडीने धावपळ करून प्रधान यांच्या हातातील डिझेलचा डबा हिसकावून घेतला. त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. या प्रकरणात चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

Back to top button