निफाड ६.१ अंशावर, द्राक्ष बागायतदार झाले गारेगार! | पुढारी

निफाड ६.१ अंशावर, द्राक्ष बागायतदार झाले गारेगार!

उगाव (ता. निफाड) : पुढारी वृत्तसेवा

सोमवारी सकाळी निफाड येथे पारा थेट 6.1 अंशावर घसरला. द्राक्षबागांवर याचे दूरगामी परिणाम होत आहे. पारा घसरण्याच्या कारणांचा अभ्यास सुरु आहे. असे असले तरी निश्चित हवामान शास्त्रीय कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

थंडीपासून द्राक्षबाग वाचविण्यासाठी द्राक्ष बागायतदार हे पहाटेच्या वेळी द्राक्षबागांमध्ये शेकोट्या पेटवून धूर आणि उष्णता निर्माण करत आहेत. त्यातून द्राक्षबागेत ऊब निर्माण होऊन तपमान नियंत्रित राहील. द्राक्ष मण्यांना तडे जाणार नाहीत. असा द्राक्ष बागायतदारांचा अनुभव आहे. त्याचबरोबर द्राक्षबागांमध्ये पहाटेपासून सूर्योदयापर्यंत ठिबक सिंचनाद्वारे पाणी देऊन द्राक्ष बागेची मुळे व पेशींचे कार्य सुरु ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

निफाड परिसरात तपमान घसरल्याच्या नोंदी बघता 8/2/1961 व  8/2/2001 आणि  27/12/2008 रोजी पारा 0.7 अंशापर्यंत घसरला होता. 23/1/2016  रोजी पारा 4.4 अंशावर घसरला होता. 28/12/2016 रोजी पारा 6.2 अंशावर घसरला होता. 12/1/2017 रोजी पारा  4 अंशावर, 30/12/2018 रोजी पारा 2.8 अंशावर, 22/12/2020 रोजी पारा 6.5 अंशावर घसरल्याच्या नोंदी आहेत. 25/12/2021 रोजी   6.5 अंशावर पारा घसरला. त्यानंतर 10/1/2022 रोजी पारा 6.1 अंशावर घसरला आहे. हे निचांकी तपमान आहे.

अभ्यासकांचे अंदाज वेगवेगळे  

निफाड तालुक्यात पारा घसरत असल्याबाबत बहुतांश हवामान अभ्यासक त्याचे संशोधन करत आहेत. मात्र अद्याप ठोस शास्त्रीय आधार प्राप्त झालेला नाही. विनता, कादवा, गोदावरी, बाणगंगा नद्यांच्या प्रवाहित पाण्यामुळे तसेच या तालुक्यात द्राक्ष, गहू, ऊस, हरभरा, कांदा या पिकांना रब्बी हंगामात शेतात पाणी देत गेल्याने वातावरण थंड होण्यास मदत होते. त्यातून पारा घसरत असल्याचा ढोबळ अंदाज व्यक्त होत आहे.

द्राक्ष शेतीतील संकटावर कायमस्वरुपी तोडगा आवश्यक

दरवर्षी अवकाळी पाऊस तसेच गारा अथवा थंडीत वाढ यामुळे द्राक्षशेतीला अडथळे येतात. त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी शासनाकडू‌न ठोस कार्यक्रम तयार होणे गरजेचे आहे. द्राक्ष शेतीला वाचविण्यासाठी द्राक्ष बागेला क्राँप कव्हरचे अनुदान देणे, तापमानाच्या चढ-उतारानुसार झालेल्या नुकसानीची भरपाई मिळेल. असे विमा कवच देणे, त्यात विभागनिहाय बदल करणे हे ठोस उपाय शासनाकडून अपेक्षित आहेत. – कैलास भोसले, उपाध्यक्ष- महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ पुणे

द्राक्ष बागांना थंडीपासून बचावाचे उपाययोजना केली जात असली तरी प्रत्यक्षात गेल्या आठ दहा दिवसांपासून निफाड, उगांव, सारोळे, सोनेवाडी, नांदुर्डी या पंचक्रोशीतील तपमान हे 10 अंशाच्या खाली-वर असे स्थिर राहिले आहे. त्यामुळे परिपक्व होत असलेल्या द्राक्षबागेतील द्राक्ष मण्यांना तडे गेल्याचे देखील दिसत आहे तसेच कडाक्याची थंडी अन् त्यानंतर सूर्यप्रकाशात राहिलेले द्राक्षघडांना सनबर्नींगचा फटका बसला आहे. अशा द्राक्ष घडांवरील मणी सुकवा पकडू लागले आहेत. तडे गेलेले द्राक्षमणी व सुकवा पकडलेले द्राक्ष मणी विरळणी करण्याचा द्राक्ष बागायतदारांचा खर्च वाढला आहे. – छोटुकाका पानगव्हाणे, अध्यक्ष द्राक्ष संघर्ष समिती

निफाड तालुक्यात कडक्याच्या थंडीमुळे परिपक्व होत असलेल्या द्राक्षमण्यांना तडे जात आहेत. परिपक्व होण्याचे अवस्थेत असलेल्या द्राक्षमण्यांची फुगवण थांबली आहे. कारण पारा घसरताच द्राक्षबागेच्या मुळ्यांचे व पेशींचे कार्य थांबते. त्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्य व्यवस्थितरित्या द्राक्षवेली उचलत नाहीत. त्यामुळे द्राक्षमण्यांच्या फुगवणीला व्यत्यय निर्माण होतो. याचे परिणाम द्राक्षमालाच्या प्रतवारीवर होऊन द्राक्ष बागायतदारांना आर्थिक फटका बसणार आहे.   –  बाळासाहेब सानप, द्राक्ष बागायतदार सोनेवाडी खुर्द ता. निफाड

Back to top button