बिगर बँक वित्तसंस्थांना नवीन वर्षात चांगले दिवस - पुढारी

बिगर बँक वित्तसंस्थांना नवीन वर्षात चांगले दिवस

शुक्रवारी सकाळी 7 जानेवारी 2022 रोजी शेअर बाजार उघडताना निर्देशांक 60,223 अंकांवर उघडला तर निफ्टी 17,925 अंकांवर स्थिरावला. निर्देशांक आता साठ हजार ते पासष्ट हजाराच्या पट्ट्यात फिरावा. भारताची अर्थव्यवस्था आता बरीच सुधारलेली आहे. आणि ती आता इंग्लंड, फ्रान्स, जर्मनीच्या खालेखाल जगात सहाव्या स्थानावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थव्यवस्था सर्वांगीण विकसित करण्यासाठी अथक परिश्रम केले आहेत. त्यामुळेच आयात निर्यातीतही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. वार्षिक निर्यातीत 37 टक्के वाढ झाली आहे.

गेल्या नऊ महिन्यानंतर आता 300 अब्ज डॉलर्सचा (22,200अब्ज रुपये) टप्पा गाठला आहे. भारत आता केवळ एक कृषिप्रधान देश आहे, ही कल्पना आता मागे पडली आहे. उद्योग, सेवा आणि कृषी या तीन ही विभागात आता भारत प्रगती करत आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेवर आता जास्त प्रकाश 1 फेब्रुवारी 2021 ला मांडल्या जाणार्‍या अर्थसंकल्पातून व त्यामधील 1 दिवस आधी मांडल्या जाणार्‍या आर्थिक सर्व्हेक्षणातून पडेल.

आपल्या अर्थव्यवस्थेला आता कुणीही विकसनशील म्हणत नाही.विकसित देशांच्या यादीत आता आपला समावेश होतो. जी-8 आणि जी-20 या गटात असलेल्या देशात भारत वरच्या क्रमांकावर आहे. एप्रिल ते डिसेंबर 2021 या 9 महिन्यांत निर्यात 443.71 अब्ज डॉलर्सवर झाला आहे. एप्रिल ते डिसेंबर 2020 च्या तुलनेत निर्यातीत 69 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ नोंदवली आहे. स्टार्टअपची कल्पना 3.4 वर्षांपूर्वी मांडली गेली, तिचे हे फलस्वरूप आहे. आता दुष्काळाचे कोणी नाव ही काढत नाही.

जून ते ऑक्टोबर 2021 या चार महिन्यांत पावसाळा समाधानकारक होता. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये (2021) देशात 59.27 अब्ज डॉलरची आयात करण्यात आली. हे प्रमाण डिसेंबर 2020 पेक्षा 38 टक्के जास्त आहे. डिसेंबर 2020 ला संपलेल्या 9 महिन्यांमध्ये 42.93 अब्ज डॉलर्सची आयात करण्यात आली होती. व्यापारी तूट (Trade Deficit)आणि वित्तीय तूट (fiscal Deficit) हे शब्द आता विसरले गेले आहेत. गेल्या बारा महिन्यांत कोरोना आणि ओमायक्रॉन यांच्या साथी आल्या होत्या, पण या साथींचा अर्थव्यवस्थेवर परिणाम द़ृश्य नाही.

लसीकरणाचा आकडा 100कोटीपर्यंत झाला आहे. 15 ते 16 वयोगटातील युवक-युवतींना आता पुढील काही महिन्यांत लसीकरण मोठ्या प्रमाणावर केले जाईल. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्व जगात मोठ्या प्रमाणावर आता डिजिटल क्रांती होत आहे. आपला देशही त्याला अपवाद नाही. प्राप्तिकर विभागाने 1 एप्रिल 2021 ते 3 जानेवारी 2022 या सुमारे 9 महिन्यांच्या कालावधीत 1॥ कोटी करदात्यांना 1 लाख 50 हजार 407 कोटी रुपयांचा परतावा दिला.

प्राप्तिकर विभाग आता नागरिकांकडून केवळ कर गोळा करण्याचाच एकतर्फी व्यवहार न करता, ज्यांचे उत्पन्न करदेय नाही, त्यांना रिफंडस देत आहे. कराच्या बाबतीत नागरिकांवर आता जास्त विश्वास ठेवला जात आहे. राष्ट्रीयीकृत बँकेतील एक बँक – बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये अशिष पांडे यांनी कार्यकारी संचालक म्हणून सूत्रे हाती घेतली आहेत. पहिल्या कार्यकारी संचालकांची मुदत संपल्यामुळे ही नेमणूक झाली. महाबँकेत रुजू होण्यापूर्वी ते युनियन बँक ऑफ इंडियामध्ये मुख्य सरव्यवस्थापक होते. महाराष्ट्र बँकेची डिसेंबर 2021 च्या तिमाहीतली प्रगती लक्षणीय होती.

देशातील इतर उद्योग व सेवा ही क्षेत्रे प्रगती करत आहेत. त्याबरोबर कृषी क्षेत्रही प्रगती करीत आहे. पण त्याला अधिक चालना देण्यासाठी केंद्र सरकार येत्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी पत-पुरवण्याचे लक्ष्य वाढवून 18 लाख कोटी रुपये करण्याची शक्यता आहे. कोरोना, ओमायक्रॉनचा साथी आणि लॉकडाऊनची शक्यता या जरी धोक्याच्या घंटा असल्या तरी, या सर्व पार्श्वभूमीवर बिगर बँक वित्तसंस्थांनी (Non Banking finance corporating) परिस्थिती पालटेल आणि त्यांना नव्या कॅलेंडर वर्षात 2022 चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. असा विश्वास क्रिसील (CRISIL) या पत मानांकन संस्थेने व्यक्त केला आहे.

डॉ. वसंत पटवर्धन

Back to top button