विमानतळ उडाला भुर्रऽर्रऽर्र..

विमानतळ उडाला भुर्रऽर्रऽर्र..
Published on
Updated on

परदेशातले आपले नातेवाईक चार दिवसांसाठी आपल्या देशात येतात आणि ऊठसूठ ते सध्या राहत असलेल्या देशाच्या तुलनेत आपल्याला कमी लेखतात, हे मला आवडत नाही. हल्लीच अमेरिकेहून आलेले एक नातेवाईक सारखे त्यांच्याकडच्या विमानसेवेचे गोडवे गात होते. एवढी अगणित विमानं आहेत तिथे, मस्त कनेक्टिव्हिटी आहे, विमान कशी भुर्रऽ भुर्र उडत असतात…

हे फारच झालं तेव्हा मी म्हटलं, 'विमान म्हटल्यावर उडणारच की! त्याचं काय एवढं कौतुक? पण तुमच्याकडे विमानतळ उडतात का भुर्रऽ भुर्र करत?' ते गोंधळले. आख्खा विमानतळ उडवणं अमेरिकेलाही जमलं नसणार. मी सरळ त्यांना आमच्या पुरंदर विमानतळाचं ताजं, फडफडीत उदाहरण दिलंं. 'आमच्याकडे गेली वीस वर्षे पुण्याचा आंतरराष्ट्रीय विमानतळ इकडून तिकडे उडतोय नुसता.'

'काय सांगताय? लास्ट टाईम मी पुण्याला व्हिजिट केलं तेव्हा पुरंदर फायनल झालं होतं. वॉज इट टू थावजंड सिक्स्टीन?'
'अहो, मेट्रो प्रकरण तर 2006 पासून चर्चेत होतं. आता 2022 मध्ये झालं तर पूर्ण होईल. हे तर चालतंच आमच्याकडे.'
'पण, विमानाचा वेग मेट्रोपेक्षा जास्तच असणार ना? त्या न्यायाने विमानतळाचा मॅटरही फास्ट सुटायला हवा होता.'

'हवा असून काय फायदा? चार-चारदा विमानातूनच विमानतळाच्या जागेची पाहणी सुरू होती आमच्याकडे. खेड, चाकण, कडूस-कोये, हवेलीतलं शिंदवणे, पुरंदरमधलं वाघापूर, कशाकशाची पाहणी केली आम्ही! तरी योग्य जागा नाही सापडली. पुरंदरची केली होती नक्‍की! लोहगाव काय वाईट होतं? तो हवाई दलाचा तळ आहे शेवटी. आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा भार पेलण्याची कुवत नाही त्याची. म्हणून तर साक्षात देवेंद्रांनी पुरंदरच्या सगळ्या मान्यता मिळवल्या.'
'ते तर परत येणार म्हणतात ना?'
'आले तरी खिशातून विमानतळ थोडाच आणणार आहेत? त्यात एकदा मविआची माशी शिंकली ती शिंकलीच! आता हवाई दलाकडूनच एकदा दिलेली छजउ मागे घेतली म्हटल्यावर ते तरी काय करणार?'
'म्हणजे? एका कागदाने मान्यता दिली, दुसर्‍या कागदाने मागे घेतली. शाळेच्या वर्गात आपण कागदाची विमानं उडवायचो, तसंच म्हणायचं की हे!'
'फुकटचे उद्योग.'

'फुकटचे नाही हं! आमच्याकडे आम्ही कशातूनही पैसा उभा करू शकतो. इथेही बघाना, पाहण्या झाल्या, समित्या स्थापन झाल्या, भूसंपादनासाठी नवी कंपनी काढली, मूळ जागा पर्यायी जागा, पर्यायी जागेला पर्यायी जागा वगैरे प्रस्ताव झाले. पैशांशिवाय हलेल का ह्यातला एक तरी कागद? दरवेळेस पर्यायी जमिनींच्या परिसरात जागेच्या किमती तर वाढणारच ना भौ! म्हणजे, विमानप्रवासी सोडता बहुतेकांचं भलं झालं म्हणा की! प्रश्‍नच नाही. जगात लहानलहान गावांमधूनही विमानं उडवता येतात. कबूल, पण एवढा मोठा विमानतळ उडवून दाखवता येईल का कोणाला? विमानतळ उडाला भुर्रऽ र्रऽ… नवा रेकॉर्ड केला!'

– झटका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news