नाशिक : शिपायाला मिळाला तहसीलदाराच्या खुर्चीत बसण्याचा मान | पुढारी

नाशिक : शिपायाला मिळाला तहसीलदाराच्या खुर्चीत बसण्याचा मान

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
येथील तहसील कार्यालयातील शिपाई बाळूमामा गवारे यांना बुधवारी (दि. 31) सेवापूर्तीनिमित्त तहसीलदारांच्या खुर्चीत बसण्याचा मान तहसीलदार बंगाळे यांनी दिला. त्यामुळे तहसीलदारांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. ज्या खुर्चीची सेवा 35 वर्षे केली त्या खुर्चीवर तहसीलदार बंगाळे यांनी शिपाई बाळू गवारे यांना सन्मानपूर्वक विराजमान केल्याने त्यांनाही दीर्घ सेवेचे समाधान लाभले.

गवारे मामांच्या सेवानिवृत्तीनिमित्त तहसीलदार तथा उपजिल्हाधिाकारी बंगाळे यांनी त्यांना सुखद धक्का देण्याचा निर्णय घेतला. ज्या माणसाने महसूल खात्यात 40 वर्षे प्रामाणिकपणे सेवा केली, त्याचा अनोखा सन्मान करण्याचा निर्णय बंगाळे यांनी घेतला. नायब तहसीलदार सागर मुंदडा व अन्य सहकारी नायब तहसीलदारांसोबत चर्चा करून गवारे मामांना एक दिवसाचा तहसीलदार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सकाळी गवारे यांना सेवापूर्तीचा दिवस तहसीलदारांच्या दालनात असलेल्या खुर्चीत बसविण्यात आले. तहसीलदारांनी खुर्चीत बसविल्यानंतर मामा भारावून गेले होते. संपूर्ण दिवसभर ते तहसीलदार म्हणून तहसीलदारांच्या खुर्चीत बसले होते. तर तहसीलदार एकनाथ बंगाळे हे समोर बसून आपले दैनंदिन काम करत होते. सायंकाळी तहसीलदारांच्या गाडीतच तहसीलदारांच्या जागेवर बसवून गवारे यांना आदरपूर्वक घरी पोहोचविण्यात आले. तहसीलदारांच्या कृतीचे कौतुक होत आहे. यावेळी नायब तहसीलदार सागर मुंदडा, संजय धनगर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

नांदूरशिंगोटे येथील मूळ रहिवासी असलेले गवारे यांनी सुरुवातीला नांदूरशिंगोटे गावात कोतवाल म्हणून काम पाहिले. त्यानंतर त्यांना तहसील कार्यालयात शिपाई म्हणून पदोन्नती मिळाली. तेव्हापासून ते तहसील कार्यालयात शिपाई म्हणून काम करत होते. सुमारे 35 वर्षे त्यांनी प्रामाणिकपणे काम केले. तहसीलदारांच्या दालनाची जबाबदारी त्यांच्याकडेच होती. दालनाची नियमित स्वच्छता ठेवण्यासोबतच तहसीलदारांना भेटण्यासाठी येणार्‍यांचे आदरातिथ्यही तेच करत असत. तहसीलदारांच्या दालनात सुनावण्यांच्या वेळी गवारे दरवाजात बसून भेटीसाठी येणार्‍यांबाबत सांगायचे. बुधवारी (दि.31) ते 40 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले.

तहसीलदारांच्या खुर्चीवर बसता यावे असे कधी तरी त्यांना वाटले असेल, त्यांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी आणि प्रामाणिक सेवेचा सन्मान करण्यासाठी गवारेमामांना तहसीलदारांच्या खुर्चीवर बसण्याची संधी दिली. कर्मचार्‍यांचा सन्मान व्हावा, असे मनोमन वाटले.- एकनाथ बंगाळे, तहसीलदार.

त्याचे चांगले फळ मिळाले. जी खुर्ची अनेक वर्षे स्वच्छ करीत होतो, त्या तहसीलदारांच्या खुर्चीवर बसण्याचे भाग्य मिळेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. तहसीलदार बंगाळेसाहेबांमुळे हा योग जुळून आला. माझ्या सुमारे 40 वर्षांच्या प्रामाणिकपणे केलेल्या सेवेचे खर्‍या अर्थाने चीज झाले. – बाळासाहेब गवारे, शिपाई.

हेही वाचा:

Back to top button