POP Murti : आता पीओपीच्या मूर्ती आयातीलाही बंदी, मार्गदर्शक तत्त्वे जाहीर | पुढारी

POP Murti : आता पीओपीच्या मूर्ती आयातीलाही बंदी, मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

प्लास्टर ऑफ पॅरिस अर्थात पीओपीच्या (POP Murti) मूर्तींपासून होणारे जलप्रदूषण लक्षात घेता शासनाने यापूर्वीच पीओपी मूर्तींच्या निर्मितीला बंदी घातली आहे. आता आयातीलाही बंदी घातली असून, त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर सोपविली आहे. त्यानुसार महापालिकेने याबाबतचे मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली असून, पीओपी मूर्तींची निर्मिती किंवा आयात करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा दिला आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या १५ मे २०२० च्या सुधारित नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार नदीचे प्रदूषण व नुकसान टाळण्यासाठी केंद्र सरकारने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर (POP Murti) बंदी जाहीर केली होती. या बंदीला न्यायालयात आव्हान दिल्यानंतर उच्च न्यायालयानेही बंदी कायम ठेवली. या पार्श्वभूमीवर पीओपीच्या मूर्ती निर्मिती, आयात, साठा बंदीबाबत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत महासंचालकांना सूचित केले आहे. दरम्यान, नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रातील गणेशोत्सव किंवा अन्य विविध सण, उत्सव, कार्यक्रमांसाठी मूर्तिकारांकडून मूर्ती निर्मिती, आयात, साठा, विक्री केली जाते. त्या अनुषंगाने शहरातील सर्व मूर्तीविक्रेते, कारखाने, कारागीर, साठवणूक करणारे व्यापारी, दुकानदार, गाळेधारक इत्यादींना बंदीबाबतच्या मार्गदर्शक सूचनांबाबत काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

तसेच नागरिकांनी प्लास्टर ऑफ पॅरिसपासून (POP Murti) तयार होणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या मूर्ती नदीपात्रात तसेच नैसर्गिक पाण्याच्या स्रोतात विसर्जित करू नये, तसेच मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर नियमांनुसार कारवाई केली जाणार असल्याचेही कळविले आहे.

हेही वाचा :

Back to top button