नाशिक : मनपातील नोकरभरतीचा मार्ग अखेर मोकळा | पुढारी

नाशिक : मनपातील नोकरभरतीचा मार्ग अखेर मोकळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अग्निशमन व वैद्यकीय या अत्यावश्यक सेवेतील रिक्तपदांबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील ७५ हजार रिक्तपदांच्या भरतीचे निर्देश दिले आहेत. या निर्देशांपाठोपाठ राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने ३५ टक्के आस्थापना खर्चाची अट शिथिल केल्याने या भरतीला महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे नाशिक महापालिकेतील सुमारे अडीच हजार पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेचा आस्थापना खर्च सातत्याने ३५ टक्क्यांपेक्षा अधिक राहिलेला आहे. यामुळे महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांनी अनेकदा मागणी करूनही केवळ आस्थापना खर्चाचे कारण पुढे करत मनपा प्रशासनाने वेळोवेळी नोकरभरती टाळली आहे. महापालिकेचा ‘ब’ वर्गात समावेश होऊनही अजूनही आस्थापना परिशिष्ट ‘क’ वर्ग आहे. मनपाच्या आस्थापना परिशिष्टावर विविध संवर्गातील ७,०९० पदे मंजूर आहेत. यातील जवळपास अडीच हजारांहून अधिक पदे सध्या रिक्त आहेत. मागील २० वर्षांत महापालिकेत नोकरभरतीच झालेली नाही. ‘ब’ संवर्गानुसार शासनाच्या मान्यतेसाठी प्रशासनाने १४ हजार पदांचा सुधारित आकृतिबंध शासनाला सादर केला होता. परंतु, नव्या आकृतिबंधाला सोडा जुन्या आकृतिबंधानुसारदेखील महापालिकेत भरती होऊ शकलेली नाही. शासनाने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर तातडीची बाब म्हणून अग्निशमन विभागातील ३४८, वैद्यकीय व आरोग्य विभागातील ३५८ अशा एकूण ७०४ पदांच्या भरतीला मान्यता दिली आहे. या भरतीची प्रक्रिया सुरू असून, मनपाने आयबीपीएस आणि टीसीएस या दोन्ही शासनमान्य संस्थांना भरती करण्यासाठीचे पत्र सादर केले आहे. ही प्रक्रिया एकीकडे सुरू असतानाच राज्य शासनाने नगरपालिका, महापालिका आणि नगरपंचायतीतील ७५ हजार रिक्तपदे भरण्याचे निर्देश दिले असून, त्यानुसार आता कार्यवाही सुरू असतानाच ३५ टक्के आस्थापना खर्च मर्यादेतील अट एक वेळेसाठी शिथिल करण्याचा निर्णय घेतल्याने नोकरभरतीतील मुख्य अडथळाच आता दूर होणार आहे. यामुळे मनपातील नोकरभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

२० वर्षांनंतर महापालिकेत भरती

शासनाने आस्थापना खर्चाची मर्यादा ३५ टक्के इतकी निश्चित केली आहे. सर्वच महापालिकांचा आस्थापना खर्च ३५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे नोकरभरती करण्यास मोठी अडचण आहे. परंतु, आता ही अडचणच दूर होणार असल्याने महापालिकांमधील भरतीबाब मोठी आशा निर्माण झाली आहे. नाशिक महापालिकेत तर २० वर्षांनंतर मोठ्या प्रमाणावरील भरती होणार आहे. यामुळे स्थानिक बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी निर्माण होईल.

हेही वाचा : 

Back to top button