पुणे : आयटी अभियंता तरुणीला साडेआठ लाखांचा गंडा | पुढारी

पुणे : आयटी अभियंता तरुणीला साडेआठ लाखांचा गंडा

पुणे : पार्ट टाईम नोकरीच्या आमिषाने आयटी कंपनीत काम करणार्‍या अभियंता तरुणीला सायबर चोरट्यांनी तब्बल 8 लाख 53 हजार रुपयांचा आर्थिक गंडा घातला. सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क केल्यानंतर एक लाईकला प्रत्येकी पन्नास रुपये मिळतील, असे प्रलोभन दाखवून संबंधित तरुणीची फसवणूक करण्यात आली आहे.

या प्रकरणी बाणेर येथील 27 वर्षीय तरुणीने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्यांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 10 ते 14 जानेवारी 2023 या कालावधीत घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही आयटीमध्ये नोकरी करते. मैत्रिणीसोबत बाणेर परिसरात ती वास्तव्यास आहे.

सध्या तिचे वर्क फ्रॅाम होम काम सुरू आहे. 10 जानेवारी रोजी तिच्या मोबाईलवर सायबर चोरट्याने मेसेज करून पार्ट टाईम जॉबसाठी सोशल मीडियावर एक लाईक केल्यास पन्नास रुपये मिळतील, असे सांगितले. तरुणीने तसे लाईक करून त्याचे स्क्रीन शॉट पाठविले. आरोपींनी देखील तिला विश्वास वाटावा म्हणून सुरुवातीला तिच्या बँक खात्यात पैसे पाठविले.

त्यानंतर तिला जास्तीचे प्रलोभन दाखवून पैसे भरण्याचे व त्यावर नफा मिळविण्याचे टास्क दिले. त्यानंतर तरुणी सायबर चोरटे सांगतील तसे पैसे भरत गेली. एकूण तिने 8 लाख 53 हजार रुपये भरल्यानंतर ना मुद्दल परत मिळाले ना नफा. फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आल्यानंतर तिने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक गुन्हे अंकुश चिंतामन करीत आहेत.

Back to top button