पुणे : ब्राह्मण समाजाची नाराजी दूर करू : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | पुढारी

पुणे : ब्राह्मण समाजाची नाराजी दूर करू : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ‘ब्राह्मण समाजात सरसकट नाराजी नाही. ब्राह्मण समाजास उमेदवारी न दिल्याने काही लोकांत नाराजी असणे स्वाभाविक आहे. ती नाराजी लवकरच दूर करू,’ असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना केला. फडणवीस आज सायंकाळी अचानकपणे पुण्यात दाखल झाले.

कसबा पेठ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसंदर्भात त्यांनी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्याचवेळी काही प्रमुख लोकांशीही त्यांनी संवाद साधला. खासदार गिरीश बापट आजारी असल्यामुळे फडणवीस यांनी त्यांची भेट घेतली. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ‘नेत्यांची नावे लिहून ब्राह्मण समाज नाराज असल्याचे फलक कसबा पेठेत लागले होते. त्यासंदर्भात फडणवीस म्हणाले, ते फलक ब्राह्मण समाजाने लावलेले नाहीत. ते कोणी लावले त्याचे तथ्य लवकरच बाहेर येईल.

गिरीश बापट यांना मी दुसर्‍यांदा भेटलो. गेल्या वेळेपेक्षा आज त्यांची तब्येत ठीक आहे. कसबा पेठ निवडणुकीबद्दल त्यांनी मला काही टीप्स दिल्या आहेत. त्यांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.’ ते पुढे म्हणाले, ’अजित पवार यांच्या शपथविधीसंदर्भात मी सत्यच बोललो. मी अर्धेच बोललो. यापूर्वी मी जेव्हा बोललो, ते ऐका. तुम्हाला सर्व लिंक लागेल. राहिलेली अर्धी माहिती मी बोलेन, त्यावेळी सर्व उलगडा होईल.’

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘फडणवीस यांचा अभिमन्यू झाला,’ असे विधान आज सकाळी पत्रकार परिषदेत केले होते. त्यासंदर्भात विचारले असता, फडणवीस म्हणाले, ‘अभिमन्यूकडून आम्ही बर्‍याच गोष्टी शिकलो. चक्रव्यूह कसा तोडायचा, ते शिकलो. एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन केले. जितेंद्र आव्हाड किंवा अन्य कोणी नेता यांना धमकी आल्यास, त्या नेत्यांना सरकारकडून पूर्ण संरक्षण देऊ. शिवस्मारकाविषयी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यामुळे ते काम सुरू झालेले नाही.’

Back to top button