खडकवासला : मोकाट कुत्र्यांसह जनावरांचा धुमाकूळ; स्थानिक रहिवासी हैराण | पुढारी

खडकवासला : मोकाट कुत्र्यांसह जनावरांचा धुमाकूळ; स्थानिक रहिवासी हैराण

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा : गेल्या अनेक दिवसांपासून सिंहगड -पानशेत भागात मोकाट कुत्र्यांसह जनावरांचा धुमाकूळ सुरू आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात शालेय विद्यार्थ्यांसह नागरिक जायबंदी होत असून, मोकाट कुत्री दररोज दहा जणांचा चावा घेत असल्याचे गंभीर चित्र पुढे आले आहे. मोकाट जनावरांच्या उपद्रवामुळे भाजीपाल्यासह उभ्या पिकांचे नुकसान सुरू आहे. मोकाट जनावरे, कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी यंत्रणा नसल्याने स्थानिक प्रशासन हतबल झाले आहे.

पानशेत, वांजळवाडी, कुरण खुर्द, आंबी, रानवडी , कादवे भागात 40-50 गाई -बैल आणि वासरे अशा मोकाट जनावरांचा कळप धुमाकूळ घालत आहे. पावसाळा संपल्याने रानात ओला चारा मिळत नाही. त्यामुळे मोकाट जनावरे थेट ज्वारी, गहू पिकासह भाजीपाला रातोरात फस्त करत आहेत. मोकाट जनावरे दिवसा घनदाट जंगलात आसरा घेतात आणि रात्रीच्या वेळी बाहेर पडतात. शेतकर्‍यांचा सुगावा लागताच क्षणात पिकाची नासाडी करुन पसार होतात. त्यामुळे शेतकर्‍यांना पिकांची राखण करण्यासाठी रात्रभर धावपळ करावी लागत आहे.

आंबी येथील शेतकरी शंकरराव निवंगुणे म्हणाले की, मोकाट जनावरांनी बांधावरील पावटा,शेतातील मका, ज्वारी कडधान्याची पिके टोळधाडी सारखी फस्त केली आहेत. अनेक शेतकर्‍यांनी मोकाट जनावरांमुळे शेती करणे बंद केले आहे. आंबीच्या सरपंच मंगल निवंगुणे म्हणाल्या की, निसर्ग, रोगांच्या प्रादुर्भावापेक्षा मोकाट जनावरांचे शेतीवर नवीन संकट उभे आहे. मोकाट जनावरे शेतकर्‍यांच्या पाळीव जनावरांवरही हल्ला करत आहेत.

वन, कृषी, महसूल व पोलीस प्रशासनाने समन्वय साधून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
खानापूर येथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वागत रिंढे म्हणाले, कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे दररोज चार ते पाच रुग्ण येतात. गेल्या पाच सहा महिन्यांत अशा रुग्णांत वाढ झाली आहे. गंभीर रुग्णांना उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात येते.
खडकवासला येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातही मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमीं झालेले रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी येत आहेत. दाट लोकवस्तीच्या उत्तमनगर, शिवणे, सिंहगड रोड भागात मोकाट कुत्र्यांच्या सुळसुळाट सुरू आहे.

पानशेतमध्येही त्रास
सिंहगड भागात अलिकडच्या पाच-सहा महिन्यांत शंभराहून अधिक मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट सुरू आहे. मोकाट कुत्र्यांनी चावा घेतलेल्या रुग्णांची संख्या महिनाभरात शंभराहून अधिक झाली आहे.

आरोग्य विभाग सतर्क
कुत्र्यांनी चावा घेतलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. हे लक्षात घेऊन आरोग्य विभागाने खडकवासला, पानशेत, खानापूर येथील आरोग्य केंद्रात रेबीज लसीचा साठा उपलब्ध केला आहे.

Back to top button