पनवेल: माजी नगराध्यक्ष सुनील घरत यांची रेशन दुकानदाराला मारहाण | पुढारी

पनवेल: माजी नगराध्यक्ष सुनील घरत यांची रेशन दुकानदाराला मारहाण

पनवेल: पुढारी वृत्तसेवा: पनवेल शहरातील माजी नगराध्यक्ष सुनील नारायण घरत यांनी जमाव करून नवीन पनवेल येथील रेशन दुकानदाराला बेदम मारहाण केली. याप्रकरणी सुनील घरत यांच्यावर खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्ह्य दाखल करण्यात आला आहे. सुनील घरत यांनी १० ते १२ जणांची टोळी जमवून मारहाण केल्याचा आरोप दुकानदार यांनी केला आहे.

रोशन संतोष कीर्तीकर (वय २५, रा. पनवेल) यांचे आदर्श नारी महिला बचत गटाच्या नावाने नवीन पनवेल सेक्टर १३ जनता मार्केटमध्ये रेशन दुकान आहे. रोशन यांनी नेहमी प्रमाणे २५ एप्रिलरोजी सकाळी रेशन दुकान उघडले होते. रेशन कार्ड पाहून रेशन देण्यास सुरुवात केली. त्याच दिवशी रात्री ८  वाजण्याच्या सुमारास नवीन पनवेल मधील एक महिला रेशन घेण्यास दुकानात आली. या वेळी रोशन यांनी या महिलेचे रेशन कार्ड पाहून तुमचे उत्पन्न वार्षिक ७५ हजार रूपये असल्याने तुम्हाला रेशन देता येणार नाही, असे सांगितले.

त्यानंतर ती महिला तिचे वडील आणि एका व्यक्तीला घेऊन रेशन दुकानात आली. या वेळी रेशन का देत नाही यावरून त्यांनी रेशन दुकानदार याच्याशी वाद घातला. त्यानंतर त्यांनी माजी नगराध्यक्ष सुनील घरत यांना बोलावून घेतले. घरत आपल्या १० ते १२ सहकाऱ्यांसोबत दुकानात पोहोचले. आणि दुकान मालकाला जबर मारहाण केली. यावेळी दुकानातील सामान, वजन काटा आणि खुर्ची फेकून दिली.

या घटनेनंतर रोशन कीर्तीकर यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात सुनील घरत आणि त्याच्यासोबत असलेल्या १० ते १२ अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा 

Back to top button