कन्नड तालुक्यात पावसाचा कहर, नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

कन्नड; पुढारी वृत्तसेवा : कन्नड तालुक्यात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु आहे. तालुक्यातील शिवना, गांधारी, पूर्णा, अंजनासह सर्वच नद्या, नाल्यांना महापूर आलाय. कन्नड तालुक्यातील अनेक गावांमधील पुलावरुन पाणी वाहत आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
या मंडळात रात्रीच्या पावसाची ८४ मि. मि. व चिखलठाण मंडळात ६४ मि. मि. अतिवृष्टि पावसाची नोंद झालीय.
या परिसरातील शिवना व गांधारी नदीला महापूर आला आहे. महापूर आल्याने धोक्याच्या पातळी ओलांडून वाहत आहे. या दोन्ही नदीच्या पुरामुळे शिवना टाकळी प्रकल्पात पाणीसाठा मोठ्या प्रमाणात होत आहे.
- पोलीस ठाण्यात मृत्य प्रकरणी चार पोलिसांवर खुनाचा गुन्हा
- नाना पटोले, “ताट वाजवून संपूर्ण देशात अवकळा आणली”
शिवना टाकळी प्रकल्प हा १००% भरला आहे. यातून १६ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग शिवना नदीत सोडण्यात येत आहे. अजून दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी सोडावे लागणार आहे.
कन्नड व गंगापूर तालुक्यातील शिवना नदीवरील पुल, रस्ते, रेल्वे मार्ग पाण्याखाली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकांना व संबधितांनी सतर्क राहावे, अशी माहिती शिवना टाकळी कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे यांनी उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते व तहसीलदार संजय वारकड यांना कळविली आहे.
चिंचोली लिंबाजी परिसरासह पूर्णा-नेवपूर धरण क्षेत्रात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे पूर्णा नदीला आतापर्यंतचा सर्वात मोठा पूर आला आहे. नदीने रोद्ररूप धारण केले आहे. नदीकाठच्या नेवपूर, वाकी, बरकतपुर, वाकद, दिगाव येथे भीतीचे वातावरण आहे.
गांधारी नदी काठी असलेले चिखलठाण, व शिवना नदी काठी असलेले आंधानेर, मक्रणपुर, डोणगांव, बहिरगाव, दाभाडी, हतनुर गावांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.
शेतातील खरीप हंगामातील पिकांची शेतात पाणी साचले आहे. नासडी होत असून जून महिन्यात ठिबक सिंचनवर लागवड केलेल्या कापसाच्या कैऱ्या काळवंडत आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.
कन्नड तालुक्यात मंडळ निहाय झालेला पाऊस –
कन्नड – ८४ मि मि , आता पर्यंत एकूण – १३३१ मि मि, चापानेर – ५४ मि मि, एकूण – ९३७ मि मि, देवगांव – ३१ मि मि, एकूण – ८३० मि मि.
चिखलठाण – ६४ मि मि, एकूण – ८४२ मि मि,
पिशोर – ५० मि मि, एकूण – ११२७ मि मि,
नाचनवेल – ६१ मि मि, एकूण – १०१५ मि मि,
करंजखेड – ६३ मि मि, एकूण – १२६२ मि मि,
चिंचोली ; ४८ मि मि, एकूण – १२८३ मि मि,
सरासरी पाऊस – ५६.८७ मि मि.,
आता पर्यंतची पावसाची सरासरी – १०७८.३७ मि मि.
HBD : लता मंगेशकर यांचा कोल्हापुरातला २५ रुपयांचा किस्सा