नागपूर, पुढारी ऑनलाईन: जैस्वाल यांचे वादग्रस्त वक्तव्य; काँग्रेसवाले मेले होते, उद्धव ठाकरे यांनी त्यांचा सरकारमध्ये समावेश केल्याने ते जिवंत झाले, असे वादग्रस्त वक्तव्य आमदार आशिष जैस्वाल यांनी नागपुरात केली. जैस्वाल हे शिवसेनेचे नसले तरी शिवसेना समर्थक आहेत. नागपूर येथील जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत प्रचारादरम्यान ते बोलत होते.
त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल होत असून याबाबत अद्याप काँग्रेसमधून प्रतिक्रिया आलेली नाही.
ते म्हणाले, 'हे काँग्रेसचे लोक मेले होते. तुम्हाला कुणी विचारत नव्हतं. उद्धव ठाकरेंनी तुम्हाला सरकारमध्ये घेतलं म्हणून हे मेलेली लोकं जिवंत झाली.
नाहीतर यांच्या दोन्ही पक्षांमध्ये अशी गळती लागली होती की कुत्रं विचारायला तयार नव्हते.
सर्व सुटकेस बांधून दुसऱ्या पक्षात जायला तयार होते. हे सर्व मेलेले लोकं जिवंत झालेले आहेत हे मी उघडपणे सांगतो,'
असे जैस्वाल बोलताना व्हिडिओत दिसतात.
जयस्वाल हे रामटेक- नागपूर येथील अपक्ष आमदार असून ते शिवसेना समर्थक आमदार आहेत. २०१९ मध्ये रामटेक मतदारसंघात ते अपक्ष निवडून आले होते.
नागपूरमध्ये जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान आशिष जैस्वाल यांनी हे वक्तव्य केल्याने त्याचे पडसाद उमटल्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून महविकास आघाडीत कुरबूर सुरू असून खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सूचक इशारा दिला होता.
अजित पवारांनी ऐकले नाही तर त्यांना सांगावे लागेल. असे म्हणत त्यांनी एकप्रकारे इशारा दिला होता.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याआधीच एकला चलो रे चा नारा देत स्वबळावर लढण्याचे घोषित केले आहे.
त्याचे पडसाद महाविकास आघाडीत उमटत आहेत.
राज्यातील शाळा सुरू करण्यावरून शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी रद्द केला होता. जैस्वाल यांचे वादग्रस्त वक्तव्य महाविकास आघाडीत कुरबूर सुरू हाोण्याची शक्यता आहे.