सामान्य माणसाने महापुरुषाबद्दल चुकीचे बोलू नये : शरद पोंक्षे | पुढारी

सामान्य माणसाने महापुरुषाबद्दल चुकीचे बोलू नये : शरद पोंक्षे

सेलू,; पुढारी वृत्तसेवा : कुठलाही पुरावा नसताना देशातील व राज्यातील महापुरुषाबद्दल अपशब्द काढणे चुकीचे आहे. महापुरुषांचे विचार आपल्याला पटत नसतील तरीदेखील सामान्य माणसाने कोणत्याही महापुरुषाबद्दल चुकीचे बोलू नये, असे परखड मत सावरकरप्रेमी शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले. ते येथील श्री साई नाट्यगृह येथे वसंत प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘समग्र सावरकर’ या विषयावरील व्याख्यानात बुधवारी (दि.९) बोलत होते. वसंत प्रतिष्ठानचे महेश खारकर, अॅड. ऊमेश खारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

पुढे बोलताना पोंक्षे म्हणाले, महापुरुषांचे विचार आपल्यासारख्या सामान्य माणसाला पटत नसतील तर, त्यासाठी सुसंस्कृत पद्धतीने विरोध झाला पाहिजे. कारण अत्यंत वाईट पद्धतीने बोलणे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभत नाही. सगळे महापुरुष एका कालखंडात होऊन गेले. सर्व महापुरुषांनी देशासाठी खूप काही कार्य केले आहे. त्यांच्याबाबत सामान्य माणसांनी बोलणे, हे सुसंस्कृत समाजाचे लक्षण नाही. कोणत्याही महापुरुषाबद्दल अपशब्द वापरून चुकीचे बोलल्यानंतर मलाही वेदना होतात, असेही पोंक्षे यांनी यावेळी स्पष्ट केले. सद्य परिस्थितीत सोशल मीडियाच्या माध्यमातून काही माणसे खोटे नाव वापरून घाणेरडे लिहीत आहेत व बोलत आहेत. याचे कारण सुसंस्कृत समाज गप्प बसलेला आहे, असेही ते म्हणाले.

माफीनामा नव्हे दयेचा अर्ज

राहुल गांधी यांनी सावरकरांनी माफीनामा लिहून दिला म्हणून वारंवार सावरकरांना टीकेचे लक्ष बनवले आहे. मात्र कायद्याचे कसलेही ज्ञान नाही. त्यांनी सावरकर वाचलेले नाहीत. ब्रिटिशांच्या कायद्यांचा अभ्यास देखील केलेला नाही. म्हणून अशा प्रकारचे घाणेरडे आरोप त्यांच्याकडून वारंवार केले जातात. तत्कालीन ब्रिटिश सरकारच्या काळात जे राजकीय कैदी कारावासात शिक्षा भोगत होते. त्यांना सरकारकडे दयेचा अर्ज करण्याची ब्रिटिश कायदेमंडळामध्ये तरतूद होती. मात्र तत्कालीन बहुतांश कैद्यांकडे ब्रिटिश कायद्यांचा अभ्यास नसल्या कारणाने दयेचा अर्ज करण्याबद्दलचे अज्ञान होते. सावरकर यांनी बॅरिस्टर पदवी संपादित केली होती. आणि ब्रिटिश कायदेमंडळाचा अभ्यास देखील केला होता. त्यामुळे त्यांना ही सर्व माहिती होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपली राजकीय शिक्षा कमी करण्यासाठी ब्रिटिश सरकारकडे स्वतः दयेचा अर्ज केला. आणि येथील इतर राजकीय कैद्यांना देखील हा अर्ज करण्यासाठी आग्रह धरला. या पाठीमागचा त्यांचा हेतू असा होता की, आपली उपयोगिता ही केवळ राष्ट्रासाठी उपयोगात आणली जावी. आपलं तारुण्य जर कारागृहात घालावे लागले तर, आपला देश स्वतंत्र कसा होईल? स्वातंत्र्य लढ्यातील उर्वरित काम आपल्याला कसे करता येईल? त्यामुळे केवळ देशहित व राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून तत्कालीन परिस्थितीत मुसद्यगिरीचा वापर करून ब्रिटिश कायद्यातील तरतुदीनुसार आपली कारागृहातील शिक्षा कमी करण्यासाठी त्यांनी अकरा वेळा सरकारकडे दयेचा अर्ज केला. याच दयेच्या अर्जाला राहुल गांधी माफीनामा म्हणतात हे पूर्णपणे अज्ञानी व चुकीचे आहे. असेही पोक्षे म्हणाले.

सावरकरांनी अकरा वर्षे जे सोसलं ते आपण एक दिवस देखील सहन करू शकणार नाही. कारागृहात त्यांना ब्रिटिश सरकारने दिलेला त्रास, त्यांची सात बाय अकराची अंधारी कोठडी. त्यांना आंघोळीसाठी तीन तांबे समुद्राचे खारे पाणी. उभे आडवे साखळदंड. एकाच जागेवर सगळे विधी व तेथेच निकृष्ट दर्जाचे भोजन. हे सगळं कल्पनेबाहेरच आहे. हे कोणीही सहन करणार नाही. मात्र सावरकर यांनी ते राष्ट्रासाठी व देशासाठी सहन केले. याची जाणीव त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना झाली पाहिजे. विनाकारण अपूर्ण ज्ञानात त्यांच्यावर आरोप करणे चुकीचे आहे. असेही शरद पोंक्षे यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचलंत का ? 

 

Back to top button