कोयता दहशतीचा नवा पॅटर्न ; पोलिसांसमोर अल्पवयीन गुन्हेगारांचे आव्हान कायम | पुढारी

कोयता दहशतीचा नवा पॅटर्न ; पोलिसांसमोर अल्पवयीन गुन्हेगारांचे आव्हान कायम

पिंपरी : परिसरात दहशत पसरविण्यासाठी सामान्य नागरिकांवर वार करीत वाहनांची तोडफोड करण्याचा नवीन फंडा गुन्हेगारांकडून पुन्हा एकदा आजमावला जात आहे. गुन्हेगारांकडून वापरला जाणारा ‘कोयता’ हा दहशतीचा नवा पॅटर्न ठरत आहे. परिणामी पोलिसांसमोर अल्पवयीन गुन्हेगारांचे आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळे सामाजिक अशांतता पसरविणार्‍या या गुन्हेगारांची वेळीच नांगी ठेचण्याची गरज निर्माण झाली आहे.

मागील काही वर्षांपासून राज्यातील वेगवेगळ्या शहरात स्थानिक गुन्हेगारांच्या कोयता गँग राडा घालत असल्याचे समोर येत आहे. घटना घडल्यानंतर पोलिस तात्काळ आरोपींना जेरबंद करतात. वेळप्रसंगी त्यांची धिंडही काढली जाते. मात्र, काही कालावधी गेल्यानंतर पुन्हा एकदा नवीन तसेच कोवळे चेहरे कोयता घेऊन समाजात दहशत पसरविताना दिसत आहेत. पिंपरी- चिंचवड शहरात नुकतेच सांगवीनंतर चिखलीतही अशा प्रकारे धुडगूस घालण्यात आला. त्यामुळे आता यापुढे अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, यासाठी पोलिसांना आणखी वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करावे लागणार आहेत.

नोंदी ठेवण्याचा फतवा कागदावरच
लोहारबांधवांनी कोयता व तत्सम घातक हत्यारे बनवून घेणार्‍यांच्या नोंदी ठेवा, असे आदेश पिंपरी- चिंचवडचे तत्कालीन पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश दिले होते. या आदेशाचे उल्लंघन केल्यास स्थानिक पोलिसांनी संबंधितांवर प्रचलित कायद्यानुसार कारवाई करावी, असेदेखील आदेशात नमूद होते. कोयता बनवून घेणार्‍याचे पूर्ण नाव, पत्ता, कोयता बनवल्याचा दिनांक अशी तपशीलवार माहिती लोहार बांधवानी ठेवावी. तसेच, कोयता बनवून मागणार्‍या ग्राहकांचे आधारकार्ड, मतदान कार्ड पाहून कोयता खरेदीचे कारण पडताळून त्यांना कोयता द्यावा, असे त्या वेळी सूचित करण्यात आले होते. कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या आदेशानुसार काही दिवस स्थानिक पोलिसांनी कागदी घोडे नाचवले. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच कृष्ण प्रकाश यांचा हा फतवा केवळ कागदावरच राहिला.

व्हिडीओमुळे वाढते घबराट
पिंपरी येथील कॅम्प परिसरात कोयता गँगने मेडिकलची तोडफोड करीत मेडिकल चालकावर वार केले होते. त्यापूर्वी मावळ येथे देखील कोयत्या गँगने धुडगूस घातला होता. नुकतेच चिखली येथेदेखील कोवळ्या पोरांनी हातात कोयता घेऊन राडा घेतला. या सर्व घटनांची चित्रफीत समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. ज्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण होत आहे.

समुपदेशनासोबत वचकही हवा
अल्पवयीन गुन्हेगारांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलिसांचे वेगवेगळे प्रयत्न सुरू असतात. पिंपरी- चिंचवड पोलिसांनी नुकतेच झोपडपट्टीतील अल्पवयीन आरोपींचे समुदेशन केले. पोलिसांनी केलेल्या या प्रयत्नाचा काही अंशी फायदा देखील झाला. मात्र, बहुतांश गुन्हेगारी वृत्तीच्या मुलांनी पोलिसांना गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे अशा मुलांना वठणीवर आणण्यासाठी समुपदेशनासोबत खाकीचा डोस देण्याची गरज असल्याचे जाणकारांचे मत आहे.

वरदहस्त कोणाचा?
झोपडपट्टी परिसरात राहणारी अल्पवयीन मुलं हातात कोयता घेऊन गुन्हे करण्याचे धाडस करतात, त्या वेळी त्यांच्या डोक्यावर कोणाचातरी वरदहस्त असतो. याचा शोध पोलिसांनी घेण्याची गरज आहे. आरोपींना अटक केल्यानंतर अल्पवयीन मुलांना फूस लावणारी व्हाईट कॉलर मंडळीसमोर येतात. साहेब, आपलाच माणूस आहे, थोडी मदत करा, अशा शब्दात पोलिसांना विनंती करतात. पोलिसांनी देखील अशा वेळी कोणाचीही भीडभाड न ठेवता संबंधित व्हाईट कॉलर मंडळींनाच खाक्या दाखवण्याची गरज आहे.

हेही वाचा :

पिंपरी : टास्कच्या बहाण्याने पावणेसात लाखांची फसवणूक

dry brushing : ड्राय ब्रशिंगने उजळा चेहरा

Back to top button