जिल्ह्यात एक कोटी 40 लाख क्विंटल साखर उत्पादन तयार : गतवर्षापेक्षा अधिक ऊसगाळप | पुढारी

जिल्ह्यात एक कोटी 40 लाख क्विंटल साखर उत्पादन तयार : गतवर्षापेक्षा अधिक ऊसगाळप

पुणे : पुणे जिल्ह्यातील ऊस संपल्याने 2023-24 मधील ऊसगाळप हंगाम आता संपुष्टात आला आहे. साखर आयुक्तालयाकडून प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 14 कारखान्यांकडून एक कोटी 32 लाख 44 हजार 267 टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. त्यातून 10.57 टक्के सरासरी उतार्‍यानुसार एक कोटी 40 लाख 4 हजार 407 क्विंटलइतके साखर उत्पादन तयार झाले आहे. गतवर्षी एक कोटी 26 लाख 91 हजार 658 टनइतके ऊसगाळप पूर्ण झाले होते. याचा विचार करता सुमारे पाच लाख 52 हजार 609 टनांनी जादा ऊसगाळप झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक बारामती अ‍ॅग्रो लिमिटेड या खासगी साखर कारखान्याने 21 लाख 54 हजार 794 टनाइतके सर्वाधिक ऊसगाळप केले आहे. तर 9.33 टक्के उतार्‍यानुसार 19 लाख 86 हजार 725 क्विंटलइतके सर्वाधिक साखर उत्पादन तयार केले आहे. त्या नंतर दौंड शुगर प्रा.लि. हा खासगी कारखाना दुसर्‍या स्थानावर आहे. या कारखान्याने 18 लाख एक हजार 877 टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. त्यांनी 9.57 टक्के उतार्‍यानुसार 17 लाख 26 हजार 200 क्विंटलइतके साखर उत्पादन तयार केले आहे. यामध्ये बारामती अ‍ॅग्रोचा साखर उतारा 9.33 टक्के तर दौंड शुगरचा उतारा 9.57 टक्के आहे.

तर दुसरीकडे 14 कारखान्यांमध्ये जिल्ह्यात 11.96 टक्क्यांइतका सर्वाधिक साखर उतारा मिळवत सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने अग्रस्थान पटकाविले आहे. या कारखान्याने 15 लाख 23 हजार 876 टनाइतके ऊसगाळप करत तिसरे स्थान पटकाविले असून, साखर उत्पादनात दुसरे स्थान मिळवले आहे. या कारखान्याने तब्बल 18 लाख 26 हजार 500 क्विंटलइतके साखर उत्पादन तयार
केले आहे.

दैनिक जादा ऊसगाळप क्षमतेचा त्यांना फायदाच

साखर कारखाना सुरू करताना असलेली दैनिक ऊसगाळप क्षमता आणि त्यानंतर शासन मंजुरीनंतर मिळालेल्या वाढीव ऊस गाळप क्षमता वाढ हे सर्वाधिक ऊसगाळप पूर्ण करण्यामागील खरे यश असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. बारामती अ‍ॅग्रो या खासगी कारखान्याची दैनिक ऊसगाळप क्षमता जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 18 हजार टनाइतकी आहे. त्या खालोखाल दौंड शुगरची प्रति दिन 17 हजार 500 टन आहे. त्यामुळे या कारखान्यांच्या जादा ऊसगाळप क्षमतेचा फायदाच त्यांना सर्वाधिक ऊसगाळप पूर्ण करण्यासाठी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा

Back to top button