नांदेड: किनाळा येथे वऱ्हाडाचा टेम्पो उलटून १७ जण गंभीर जखमी | पुढारी

नांदेड: किनाळा येथे वऱ्हाडाचा टेम्पो उलटून १७ जण गंभीर जखमी

शंकरनगर: पुढारी वृत्तसेवा : नांदेड- देगलूर राज्य महामार्गावरील किनाळा (ता. बिलोली) येथील शाळेजवळ वऱ्हाडाचा टेम्पो उलटून झालेल्या अपघातात वधूच्या बहिणीसह १७ जण गंभीर जखमी झाले. ही घटना आज (दि.५) सकाळी दहाच्या सुमारास घडली.

सविस्तर माहिती अशी की, वैजापूर पारडी (ता. मुदखेड) येथील मारोती विठ्ठलराव मंगलआरपे यांच्या मुलीचा देगलूर (ता. शहापूर) येथील सोपानराव मारुती कमलेकर यांच्या मुलासोबत आज सकाळी बारा वाजता देगलूर येथे विवाह आयोजित करण्यात आला होता.

या विवाह सोहळ्यासाठी वैजापूर पारडी येथून वधूकडील वराडी मंडळी (एमएच 26 एडी 6572) टेम्पोमध्ये वधूला भेट दिलेल्या वस्तू घेऊन जात होते. हा टेम्पो नांदेड -देगलूर राज्य महामार्गावर किनाळा जवळ आला असता येथील उतारावर शाळेच्या जवळ रोडच्या मधोमध पलटी झाला. यात वधूच्या बहिणीसह १७ जण गंभीर जखमी झाले.

किनाळा येथील विलास पांचाळ, नागेश मोहिते, होसाजी उगे, माधव वाघमारे आदीसह नागरिकांनी जखमींना तत्काळ नायगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हालविण्यात आले.

रामतीर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस जांभळीकर व त्यांचे सहकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. या घटनेची रामतीर्थ पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

हेही वाचा 

Back to top button