विटा; पुढारी वृत्तसेवा : येथील प्रशासकीय कार्यालयातली तरी स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवा आणि या इमारतीला किमान वृद्ध लोकांसाठी तरी लिफ्ट सुरू करा अशा सूचना आमदार अनिल बाबर यांनी संबंधितांना दिल्या.
गेल्या काही दिवसांपासून महसूल विभागाशी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कामाबाबत आमदार बाबर यांच्याकडे सातत्याने तक्रारी येत होत्या. अखेरीस प्रत्येक वेळी फोन करणे शक्य नसल्याने आज गुरुवारी (दि.१०) कामासाठी आलेल्या सर्व लोकांना घेवून आमदारांनी चक्क तहसील कार्यालय गाठले.
कार्यालयात आले असता तहसीलदार उदयसिंह गायकवाड हे उपस्थित नव्हते. तहसिलदार पिक कापणीच्या बैठकीसाठी सांगलीला गेल्याचे सांगितले यावेळी सांगण्यात आले. यावर आमदार बाबर यांनी थेट जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना फोन लावून जिथे पेरण्याच नाहीत तिथे पिक कापणीच्या बैठका कसल्या घेताय ? प्रश्न केला. त्यानंतर प्रत्येक विभागात जावून बाबर यांनी लोकांच्या कामाचा पाठपुरावा केला. शिवाय कर्मचाऱ्यांच्याही समस्या ऐकून घेतल्या.
त्यावर काही प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी, महसूलमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयालाही फोन वरून संपर्क साधला. दरम्यान, खुद्द आमदारच तहसील कार्यालयात आल्याची माहिती मिळताच प्रांताधिकारी विक्रम बांदल हेही प्रशासकीय इमारतीत हजर झाले.
यावेळी आमदार बाबर यांना काही वयोवृध्द मंडळी भेटून कामे सांगत होती. त्यांना पायऱ्या चढणे उतरणे मुश्किल असल्याचे दिसताच आमदारांनी तात्काळ अशा लोकांसाठी तरी लिफ्ट चालू करा अशा सूचना फोनवरूनच संबंधीत विभागाला दिल्या. प्रशासकीय कारभार तर स्वच्छ पाहिजेच,पण इमारत आणि त्यातील स्वच्छतागृहे देखील स्वच्छ राखा, त्याची रंगरंगोटीही अधून मधून करत जावा अशा सूचनाही आमदार बाबर यांनी दिल्या.
हेही वाचा;