बेळगाव : प्रियकराने पुलावरून ढकललेल्‍या प्रेयसीचा मृत्‍यू | पुढारी

बेळगाव : प्रियकराने पुलावरून ढकललेल्‍या प्रेयसीचा मृत्‍यू

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा प्रियकर तरुणाने आपल्या प्रेयसीवर संशय घेत आधी तिला मारहाण केली. त्यानंतर तिला गोगटे सर्कल उड्डाण पुलावरून ढकलून दिले. यामध्ये जखमी झालेल्या महिलेचा तीन आठवड्यांनी मृत्यू झाला. 15 एप्रील रोजी रात्री ही घटना घडली होती. 4 मे रोजी सायंकाळी 6 वा. सदर महिला मृत पावली.

अश्विनी प्रवीण कांबळे (वय 35, मूळ रा. लक्ष्मी गल्ली, बिजगर्णी, सध्या गोल्लर चाळ खासबाग, शहापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी आकाश यल्लाप्पा निलजकर (वय 24, रा. गणपती गल्ली बिजगर्णी) यांच्याविरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत माहिती अशी की, अश्विनी कांबळे ही महिला पतीशी भांडण करून बाहेर पडली होती. ती मुलीसोबत एकटीच खासबाग येथील गोल्लर चाळीत राहात होती. ती मुळची बिजगर्णी येथील असून याच गावातील सेंट्रिंग काम करणार्‍या आकाश निलजकर याच्याशी तिची ओळख होती. 15 एप्रील रोजी रात्री 10 वा. आकाश हा सदर महिला राहात असलेल्या खासबाग येथील गोल्लर चाळ येथे गेला. अश्विनीशी भांडण काढून जातीवाचक अर्वाच्च शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी महिलेची मुलगी कोमल कांबळे ही सोडवण्यासाठी गेली असता तिला देखील मारहाण केली. यानंतर त्याने दोघींनाही घरात कोंडून घातले.

संबंधित बातम्या

पुलावरून ढकलले

15 एप्रील रोजी रात्री हे सर्व घडल्यानंतरही आकाशचा राग शांत झाला नव्हता. त्याने 16 एप्रील रोजी पहाटे चारच्या सुमारास सदर महिलेला जबरदस्तीने घरातून बाहेर घेऊन आला. पहाटेच्या सुमारास गोगटे सर्कलजवळील रेल्वे उड्डाण पुलाजवळ आल्यानंतर दोघांचे पुन्हा भांडण सुरू झाले. रागाच्या भरात आकाशने अश्विनीला येथील रेल्वे उड्डाण पुलावरून खाली ढकलून दिले. यामध्ये ती गंभीर जखमी झाल्याने तिला केएलई रूग्णालयात दाखल केले होते. परंतु, तिची प्रकृती अधिकच नाजूक बनल्याने हुबळी येथील कीम्स् हॉस्पीटलमध्ये दाखल केले होते. परंतु, उपचाराचा उपयोग न होता तिचा 4 मे रोजी सायंकाळी हुबळी येथे मृत्यू झाला. या प्रकरणी श्रीमती शांता लक्ष्मण केळगेरी (रा. आंबेडकर गल्ली, धामणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आकाशवर शहापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर तिगडी हे या घटनेचा तपास करीत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button