मडगाव : कॅसिनोच्या नादामुळे युवकाचे कुटुंब देशोधडीला; कर्ज फेडण्यासाठी वृद्धावर हमाली करण्याची वेळ | पुढारी

मडगाव : कॅसिनोच्या नादामुळे युवकाचे कुटुंब देशोधडीला; कर्ज फेडण्यासाठी वृद्धावर हमाली करण्याची वेळ

मडगाव; विशाल नाईक : कुडचडेत सुरू असलेल्या बेकायदेशीर कॅसिनोमुळे लोकांची घरे उध्वस्त होऊ लागली आहेत. विवाहासाठी काढलेले कर्ज कॅसिनोवर लुटून कर्जबाजारी झालेल्या नवरदेवाचा विषय चर्चेत असताना आता कॅसिनोच्या नादाला लागून दहा लाख रुपयांच्या कर्जात बुडालेला युवक चार महिन्यांपासून बेपत्ता असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

माणुसकीला लाजवणारा प्रकार असा की आपल्या मुलाचे प्राण वाचण्यासाठी वृद्ध वडिलांनी म्हातारपणी आधार असलेले आपले घर गहाण ठेवले आहे. दहा लाख रुपयांच्या कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी साठ वर्षीय वृद्धावर मडगावात हमाली करण्याची वेळ आली आहे. युवकाचे नाव मोंतेश होनेक्री असे असून त्याला कर्ज न फेडल्यास जीवे मारण्याची धमकी कॅसिनोच्या मालकाकडून देण्यात आल्यापासून तो बेपत्ता आहे. आपला मुलगा जिवंत आहे की नाही हे आपल्याला माहिती नाही. चार महिने होत आले. त्याचा मोबाईल बंद आहे.

सलग दोन महिने मी कुडचडे पोलिस स्थानकाचे उंबरठे झिजवले असून दरवेळी आश्वासन देऊन पाठवले जाते. यामुळे आता आपण पोलीस स्थनाकात जाण्याचे सोडले आहे. तो जीवंत आहे की नाही हेही माहिती नाही, असे गोटप्पा यांनी दै. ‘पुढारीशी बोलताना  गोटप्पा होनेक्री यांनी माहिती दिली.

पोलिसच कॅसिनोचे मालक

कुडचडेत पोलिसांच्या संगनमताने आणि एका राजकारण्याच्या आशीर्वादाने कॅसिनो चालू आहेत. काही पोलीस तर स्वतःच कॅसिनोचे मालक बनले आहेत. कॅसिनोच्या नादाला लागून कित्येक युवक कर्जबाजारी झाले आहेत. पोलीस स्वतः कॅसिनोतील थकबाकी वसूल करण्यासाठी जात असल्याने कुडचडेत कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत.

पोलिसाकडून धमकी

या घटनेमुळे कुडचडे पोलीस स्थानक संशयाच्या घेर्‍यात आले आहे. स्थानकातील पोलिसाचे कॅसिनो प्रकरणात नाव समोर येत आहे. या पोलिसाने मोंतेश याला पैसे फेडण्याबाबत धमकावले होते. त्याच्या घरावर बुलडोझर फिरवण्याची धमकी दिली होती. कॅसिनोच्या व्यवसायात तो भागीदार असल्याची चर्चा असून त्याच्याकडून मोंतेशच्या कुटूंबाला धोका आहे, असे काहींचे मत आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तत्काळ चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी जोर धरत आहे.

हेही वाचा;

Back to top button