Gold and Silver Price Today | ‘अक्षयतृतीया’आधी सोने-चांदी दरात बदल, जाणून घ्या नवे दर | पुढारी

Gold and Silver Price Today | 'अक्षयतृतीया'आधी सोने-चांदी दरात बदल, जाणून घ्या नवे दर

पुढारी ऑनलाईन डेस्क : अक्षयतृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी (Akshaya Tritiya 2024) एक शुभमुहूर्त समजला जातो. येत्या १० मे रोजी अक्षयतृतीया आहे. या मुहूर्तावर सोने (Gold Price Today) खरेदी केली जाते. पण याआधीच सोने- चांदी दरात वाढ झाली आहे. आज सोमवारी (दि.६) शुद्ध सोने म्हणजे २४ कॅरेटचा दर ४३० रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम ७१,६२१ रुपयांवर खुला झाला. तर चांदीचा (Silver Price Today) दर ९७६ रुपयांनी वाढून प्रति किलो ८०,९६५ रुपयांवर पोहोचला. याआधी ३ मे रोजी चांदीचा दर प्रति किलो ७९,९८९ रुपयांवर होता.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, ६ मे रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,६२१ रुपये, २२ कॅरेट ६५,६०५ रुपये, १८ कॅरेट ५३,७१६ रुपये आणि १४ कॅरेटचा दर ४१,८९८ रुपयांवर खुला. तर चांदीचा दर प्रति किलो ८०,९६५ रुपयांवर खुला झाला.

यंदाच्या वर्षात आतापर्यंत सोन्याच्या दरात सुमारे ८,२०० रुपयांनी वाढ झाली आहे. १ जानेवारी सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ६३,३५२ रुपयांवर होता. आता हा दर ७१,६२१ रुपयांवर गेला आहे.

सोन्याच्या किमतीतील ही अभूतपूर्व वाढ जागतिक स्तरावर अनिश्चितता असल्याचे संकेत देते. व्यापारातील तणाव, जागतिक प्रमुख शक्तींमधील आर्थिक संघर्ष, प्रगत अर्थव्यवस्थांमधील विक्रमी उच्च व्याजदर आणि विशेषत: मध्य पूर्वेतील युद्धस्थिती यासारख्या घटकांमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदार सोन्याकडे वळले आहेत. परिणामी सोने महागले आहे. तसेच भारतात ऐन लग्नसराईत सोन्याला मागणी वाढल्याने दर वाढत असल्याचे दिसून येते.

सोने का महागले, कोणते घटक कारणीभूत?

  • देशात लग्नसराईमुळे वाढलेली मागणी
  • मध्य पूर्वेतील युद्धस्थिती
  • सेफ हेवन अर्थात सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे कल अधिक
  • प्रगत अर्थव्यवस्थांमधील उच्च व्याजदर
  • एकूणच जागतिक स्तरावर अनिश्चितता

शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट हे शुद्ध सोने मानले जाते. पण, दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर होतो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे नमूद केलेले असते. (Gold Price Today)

हे ही वाचा :

Back to top button