भुलाबाईची गाणी! तोंडाला मास्क लाव गं सूनबाई, मग जा आपुल्या माहेरा!                  | पुढारी

भुलाबाईची गाणी! तोंडाला मास्क लाव गं सूनबाई, मग जा आपुल्या माहेरा!                 

उमरखेड (जि. यवतमाळ); प्रशांत भागवत : अनंत चतुर्दशी अर्थात गणेश विसर्जन, यादरम्यान ग्रामीण भागात सर्वत्र सायंकाळ झाली की, गडबड गीतांचे स्वर कानी पडत होते. ही अस्सल ग्रामीण कौटुंबिक जीवन दर्शन प्रगट करणारी गाणी म्हणजे भुलाबाईची गाणी.

यावेळी आठवण येते भुलाबाईची अन्‌ तिच्या भुलोजी राजाची. हे दोघे म्हणजे शंकरपार्वती. त्यांची मातीची, चटक रंगात रंगवलेली जोडमूर्ती, त्यात मातेच्या मांडीवर बसलेला बाळ गणेश, मूर्ती घरी येताच मुलींच्या भुलाबाईच्या गाण्यांना मोठी रंगत येत असे.

‘पहिली गं पुजाबाई देवा देवा साजे, साथीला खंडोबा खेळी खेळी मंडोबा’ या गाण्याने सुरुवात झाली की, खिरापतीच्या गाण्यापर्यंत तारूण्याच्या पहिल्या पायरीवर पाय ठेवणार्‍या मुलीच्या चढाओढीने सुसाट गाण्यांची एक्‍स्प्रेस धावत असे. सुरुवातीला एक महिना चालणारा हा भुलाबाईचा सोहळा अलीकडे पाच दिवसांवर व आता तर एक दिवसावर सीमित झाला आहे. किंबहुना, कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे. तथापि, आजही गावखेड्यात भुलाबाईची संस्कृती जपण्याचा थोडाफार प्रयत्न दिसून येतो आहे.

खरे पाहता, भुलाबाईची गाणी ही मुलींवरील संस्कार व संसाराची उत्स्फूर्त, अशी परंपरागत गाणी आहेत. या लोककाव्यामध्ये माहेर-सासर, चाली-रीती, व्यवहार-नीती अशा सर्वच मुल्यांचा उलगडा होतो. विशेष म्हणजे, ही गाणी लहान मुलींपासून ते आजीपर्यंत तोंडपाठ असतं. घरातील लहान मुलींना भुलाबाईच्या गाण्यांचे खूप वेड असते. मैत्रिणींसोबत घरोघरी भुलाबाईची गाणी म्हणताना दम लागेपर्यंत उंच आवाजातील गाण्यांचा आवाज अंगण दणाणून सोडत असे.

भुलाबाईच्या प्रत्येक गाण्यात सासर व माहेर यातील गोडवा, कडवट अनुभव त्यांची सुंदर गुंफण पाहावयास मिळते.’नंदा भावजया दोघी जणी दोघी जणी… घरात नाही तिसरं कोणी तिसरं कोणी, शिक्‍यातलं लोणी खाल्लं कोणी, तेच खाल्लं वहिनीनं, वहिनीनं, आता माझा दादा येतील गं, येतील गं, दादाच्या मांडीवर बसील गं, बसील गं, दादाची बायको चोट्टी चोट्टी, असू दे माझी चोट्टी चोट्टी, घ्या काठी, लगाव काठी, घरादाराची लक्ष्मी मोठी!’ अशा या गाण्यांमधून नंदा-भावजया यांच्यातील ‘मधुर’ संबंधांवर नेमके भाष्य केलेले आढळते.

‘गाई गाई दूध दे, दूध माझ्या बगळ्याला बगळ्या बगळ्या गोंडे दे, गोंडे माझ्या राजाला, तेच गोंडे लेऊ, सासरला जाऊ, सासरच्या वाटे, कुचू कुचू दाटे, पंढरीच्या वाटे नारळ फुटे!’ माहेरी आलेल्या मुलीला सासरला निघताना माहेर सोडवत नाही व सासरचा दुरावाही सहन होत नाही.’नदीच्या काठी राळा पेरला, बाई राळा पेरला. एके दिवशी काऊ आला बाई, काऊ आला. एकच कणीस तोडून नेलं बाई, तोडून नेलं. सईच्या अंगणात टाकून दिलं बाई टाकून दिलं’ही गाणी जाताना मुलींमध्ये प्रचंड उत्साह असतो.

सासर-माहेरच्या तुलना करताना संसाराचे रुपडे अधिकच गडद झालेले दिसते.’कारल्याचा वेल लाव गं सूनबाई मग जा आपल्या माहेरा माहेरा! कारल्याचा वेल लावला हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना’ या गाण्यातून सासू-सुनेच्या नात्याची वीण अधिक घट्ट झालेली दिसते. आजच्या कोरोनाचा प्रभावही सासूवर पडलेला दिसतो, तो असा ‘तोंडाला मास्क लाव गं सूनबाई मग जा आपुल्या माहेरा, माहेरा’असे म्हणण्याची वेळ आली आहे.

गुलाबाच्या डोहाळ्यापासून, तर तिच्या बाळापर्यंत या गाण्यांमधून संस्कृतीचे यथार्थ दर्शन घडते. ‘भुलाबाई राणीचे डोहाळे, तिचे डोहाळे, तिला बाई नेऊन टाका पलंगावरी  पलंग फिरे चौक फिरे शंकर बसिले शेजारी’ शेवटच्या टप्प्यातील अडकित जाऊ, खिडकीत जावु, खाडकीत होता बत्ता, भुलोजीला मुलगा झाला नाव ठेवा दत्ता!… ते गीत गाताना लहान मुली अधिक मोठ्या आवाजात गाऊ लागतात.

शेवटी खिरापतीची वेळ झालेली असते. अशावेळी लहान भाऊरायाही खिरापतीची मजा लुटताना दिसतात.’बाणा बाई बाणा साखरेचा बाणा गाणे संपले खिरापत आणा’ एकंदरीतच हा विदर्भ मराठवाड्यासह खान्देशाच्या ग्रामीण संस्कृतीचा सोहळा, अविट नात्यांचा गोडवा गातो, हेच खरे!

हेही वाचलंत का? 

Back to top button