कांदा दरात २३० रुपयांची वाढ, मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच! | पुढारी

कांदा दरात २३० रुपयांची वाढ, मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच!

लासलगाव, पुढारी वृत्तसेवा : लालसगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याच्या दरामध्ये एका दिवसात २३० रुपयांची वाढ पाहायला मिळाली. उन्हाळ कांद्याला कमाल २१३० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला भावामध्ये जरी वाढ दिसत असली मात्र मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये चाळीमध्ये कांदा साठवून ठेवलेला होता बदलत्या वातावरणामुळे कांद्याच्या वजनात आणि प्रतवारी मध्ये कमालीची घट झाल्याने वाढलेल्या भावाचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत नाही.

गेल्या काही दिवसांपासून संततधार तर कधी मुसळधार पावसामुळे दक्षिणेकडील आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमधून नवीन लाल कांदा उशिराने बाजारात दाखल होणार आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांनी चाळीत साठवून ठेवलेला उन्हाळ कांदा खराब होत आहे.

परिणामी, मागणी आणि पुरवठा यात तफावत निर्माण झाल्याने कांद्याच्या बाजारभावात मंगळवारच्या तुलनेत एकाच दिवसात २३० रुपयांची वाढ होत उन्हाळ कांद्याला २१२० रुपये इतका कमाल बाजार भाव मिळाला आहे. २९ जुलै रोजी उन्हाळ कांद्याला २०२० रुपये भाव मिळाला होता.

त्यानंतर कांद्याच्या बाजार भावात सातत्याने घसरण झाली होत. मात्र पावणेदोन महिन्यानंतर पुन्हा उन्हाळ कांदा लासलगाव बाजर समिती दोन हजार रुपये पार झाला आहे.

येथील लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समिती ९११ वाहनातून १४ हजार ७६ क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक विक्रीसाठी दाखल झाली होती, त्याला कमाल २१२० रुपये, किमान ८०० रुपये तर सर्वसाधारण १९८० रुपये इतका प्रतिक्विंटलला बाजार भाव मिळाला आहे.

Back to top button