पोलिसांनी जेरबंद केलेला ‘लखोबा लोखंडे’ आहे तरी कोण? - पुढारी

पोलिसांनी जेरबंद केलेला ‘लखोबा लोखंडे’ आहे तरी कोण?

पुढारी ऑनलाईन डेस्क : लखोबा लोखंडे हे आचार्य अत्रे यांच्या तो मी नव्हेच या नाटकातील पात्र भरपूर गाजले. निपाणीच्या तंबाखू व्यापाऱ्यावर आधारित हे पात्र नाटकात खलनायक होते. अनेक महिलांना फसविणारा हा लखोबा कोर्टातून सहीसलाम सुटतो. त्यामुळे त्याचे नाव फसवेगिरीशी जोडले. आता आधुनिक काळात असे लखोबा भलतेच उद्योग करत आहेत.

माहीमच्या एका तरुणाने सोशल मीडिया अकाऊंट काढून त्याला लखोबा लोखंडे असे नाव दिले.

त्यातून त्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांची यथेच्छ बदनामी केली.

हा तरुण पुणे सायबर सेलच्या जाळ्यात अडकला, मात्र, त्याला जामीन दिला असून शिवसेना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्याला काळे फासले.

या सगळ्या प्रकाराचा भाजपने निषेध केला असून संबधित युवक भाजप आयटी सेलचा मेंबर आहे का? याबाबत मात्र, भाजपने काहीच उत्तर दिलेले नाही.

लखोबा लोखंडे हे पात्र नाटकात जसे गाजले तसे राजकारणातही गाजले.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली.

त्यानंतर जाहीर सभांतून बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना लखोबा लोखंडे अशी उपरोधिक उपाधी दिली.

त्यानंतर भुजबळ यांनी बाळासाहेबांना टी बाळू असे उत्तर दिले होते. तर असा हे लखोबा लोखंडे हे नाव भलत्याच कारणासाठी वापरले जाते.

या नावाचा वापर करून पुण्यातील एक तरुण महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,

बाळासाहेब ठाकरे यांच्यासह अन्य नेत्यांची यथेच्छ बदनामी करत होता.

त्याने दिले आव्हान

१३ मे रोजी ‘लखोबा लोखंडे’ या सोशल मीडिया हॅन्डलवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर बरेच दिवस हा तरुण गायब होता.

त्याने आपल्याला पकडणाऱ्याला १०० कोटी रुपये देऊ असे आव्हानही दिले होते. मात्र, पुणे पोलिसांच्या ‘सायबर सेलने लखोबा लोखंडेचा माग काढत त्याला जेरबंद केले.

याप्रकरणी अटक केलेला अभिजित लिमये (वय ३५) हा तरुणच लखोबा लोखंडे हे अकाऊंट हँडल करत असल्याचे समोर आले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल सातत्याने आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करण्यात येत होता.

याप्रकरणी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने गुन्हा दाखल केला होता.

त्यानंतर ‘मला पकडून दाखवणार्‍यांना १०० कोटी रूपयांचं बक्षीस देणार’ असं आव्हान लखोबा लोखंडे या अकाऊंटवरून केले होते.

१८ सप्टेंबरला अभिजित लिमये याला मुंबईतील माहीमच्या घरातून अटक करण्यात आली. पुणे कोर्टात लिमये याला दुसऱ्याच दिवशी हजर केल्यानंतर त्याला जामीन मिळाला.

त्यानंतर तो बाहेर येताच राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या तोंडाला काळे फासत बेदम चोप दिला.

यापुढे असे करणार नाही असे सांगितल्यानंतरच त्याला सोडून दिले.

‘लखोबा लोखंडे भाजपचाच’

‘लखोबा लोखंडे’ हे अकाऊंट भाजपच्या सोशल मीडिया टीममधील असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केला होता.

शिवाय लिमये याला जामीन मिळवून देण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

लिमयेच्या तोंडाला काळे फासल्यानंतर या प्रकाराचा भाजपने निषेध केला आहे.

अत्रेच्या नाटकातील पात्र

लखोबा लोखंडे हे आचार्य अत्रे यांच्या नाटकातील प्रसिद्ध पात्र. माधव काझी या गुन्हेगारावर अत्रे यांनी ‘तो मी नव्हेच’ हे पुस्तक लिहिले.

त्यावरील नाटक रंगमंचावर आले आणि त्याने धमाल उडवून दिली.

निपाणी येथील एक तंबाखू व्यापारी विविध महिलांना फसवत कायद्याच्या कचाट्यातून सहीसलामत बाहेर पडतो.

तो विविध सोंगे कशी घेतो, साक्षीदारांनाच कसे बुचळ्यात पाडतो असे हे भन्नाट पात्र नेहमीच राजकीय पटलावर जिवंत राहिले आहे.

हेही वाचा : 

Back to top button