मंगळावर शेकडो काळे कोळी? …दिसतं तसं नसतं! | पुढारी

मंगळावर शेकडो काळे कोळी? ...दिसतं तसं नसतं!

लंडन : मंगळभूमीची जी छायाचित्रे आजपर्यंत समोर आलेली आहेत, त्यापैकी अनेक छायाचित्रांमधून अनेकांना वेगवेगळे भास झालेले आहेत. कधी डोंगरावरून उतरत असणारी व्यक्ती दिसते, तर कधी चक्क घर दिसते, कधी दरवाजा दिसतो, तर कधी एखादा प्राणी दिसतो. अर्थातच, हे सर्व भास आहेत. मात्र, एलियनवाद्यांना अशा छायाचित्रांमुळे आपला दावा मांडण्याची नवी संधी मिळत असते. आताही मंगळभूमीवरील काही छायाचित्रांमध्ये शेकडो काळ्या रंगाचे कोळी असल्यासारखा भास निर्माण झालेला आहे. अर्थातच, हे कोळी नसून हिवाळ्यात गोठलेला कार्बन डायऑक्साईड आहे.

युरोपियन स्पेस एजन्सीने मंगळाची ही छायाचित्रे टिपली आहेत. सकृतदर्शनी पाहिल्यावर वाटते की, मंगळाच्या जमिनीवर शेकडो काळे कोळी फिरत आहेत. हे छायाचित्र मंगळाच्या दक्षिण ध्रुवावरचे आहे. युरोपियन स्पेस एजन्सीच्या ‘मार्स एक्स्प्रेस’ने हे छायाचित्र टिपले आहे. वास्तविक, हे कोळी नसून मंगळाची खासियत असलेल्या काही वैशिष्ट्यांपैकी एक आहे.

ज्यावेळी हिवाळ्यात गोठलेल्या कार्बन डायऑक्साईडवर उन्हाळ्यात ऊन पडते त्यावेळी अशा छोट्या काळ्या रंगाच्या आकृत्या बनतात. उष्णता वाढू लागते तसे खाली गोठलेला कार्बन डायऑक्साईड वायूमध्ये रूपांतरित होऊ लागतो. हळूहळू हा वायू वर असलेल्या बर्फाला भेदून बाहेर येतो. आपल्याबरोबर तो काळी सामग्रीही घेऊन येतो व त्यामुळे अशा रचना दिसतात.

‘इएसए’ने आपल्या अधिकृत वेबसाईटवर म्हटले आहे की, काळ्या धुळीने भरलेला वायू बर्फाच्या भेगांमधून बाहेर फुटून येतो आणि उंच फवार्‍यांच्या रूपात उसळतो. त्यानंतर पुन्हा खाली पृष्ठभागावर येऊन गोठून जातो. यामुळे 45 मीटरपासून ते 1 किलोमीटर रुंदीचे काळे डाग निर्माण होतात. या प्रक्रियेमुळेच कोळ्यांच्या आकाराचे असे पॅटर्न्स बनतात. मंगळाच्या याच परिसराजवळ ‘इंका सिटी’ असे नाव दिलेले ठिकाण आहे. त्याला ‘इंका’ संस्कृतीचे नाव यासाठी दिले आहे; कारण तिथे डोंगराळ भाग पाहायला मिळतो. इंका संस्कृतीमधील अवशेषांसारखी रचना या ठिकाणी आहे.

Back to top button