प्रवाशांना दिलासा; रेल्वे प्रशासनाकडून मोफत पाणी वाटप; डीआरएम उतरल्या प्लॅटफॉर्मवर | पुढारी

प्रवाशांना दिलासा; रेल्वे प्रशासनाकडून मोफत पाणी वाटप; डीआरएम उतरल्या प्लॅटफॉर्मवर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : तापदायक उन्हाळ्याच्या उकाड्यात रेल्वे प्रवाशांना आता दिलासा मिळत असून, पुणे रेल्वेस्थानकावर प्रशासनाच्या वतीने प्रवाशांना मोफत थंडगार पाण्याचे वाटप करण्यात येत आहे. स्काउट गाइड आणि रेल्वे कर्मचार्‍यांच्या मदतीने पुणे स्थानकावर ही सेवा पुरवली जात आहे. वाढती गर्दी आणि उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणेविविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

गर्दीमुळे प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये आणि गर्मीमुळे प्रवाशांना कोणत्याही आजाराचा सामना करावा लागू नये, याकरिता आता रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) इंदू दुबे या स्वत: प्लॅटफॉर्मवर उपस्थित राहून प्रवाशांना पुरविण्यात येणार्‍या सेवांची लक्ष घालून पाहणी करीत आहेत. या वेळी प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याकरिता विशेष काळजी घेतली जात आहे.
दौंड- इंदूर सुपरफास्ट एक्स्प्रेस, मुंबई कोयना एक्स्प्रेस, पुणे- दरभंगा एक्स्प्रेस, बंगलोर-जोधपूर एक्स्प्रेस, हजरत निजामुद्दीन-वास्को द गामा, मुंबई उद्यान एक्स्प्रेस आणि पुणे-दानापूर स्पेशल एक्स्प्रेस, गोरखपूर एक्स्प्रेस यांसह स्थानकावरून ये-जा करणार्‍या विविध रेल्वेगाड्यांमध्ये आणि स्थानकावर प्रवाशांना मोफत पिण्याच्या पाण्याचे वाटप केले जात आहे.

उत्तर प्रदेश, बिहारला जाणार्‍या गाड्यांना गर्दी

उन्हाळी सुट्यांमुळे पुणे रेल्वेस्थानकावर प्रचंड गर्दी होत आहे. त्यात विशेष म्हणजे उत्तर प्रदेश आणि बिहारला जाणार्‍या गाड्यांना प्रमाणापेक्षा अधिक गर्दी आहे. याकरिता रेल्वेने विशेष गाड्या सोडल्या आहेत. मात्र, तरीदेखील स्थानकावरील गर्दी नियंत्रणात येत नाही. त्या पार्श्वभूमीवर रेल्वेने अतिरिक्त आरपीएफ कर्मचारी तैनात केले आहेत. त्यासोबतच वरिष्ठ अधिकारीसुद्धा प्लॅटफॉर्मवर उतरून जातीने लक्ष घालत आहेत.

हेही वाचा

Back to top button