Rashmika Mandana : रश्मिकाचा प्रिय ‘केटलबेल’ व्यायाम कसा असतो?; काय हाेतात फायदे? | पुढारी

Rashmika Mandana : रश्मिकाचा प्रिय ‘केटलबेल’ व्यायाम कसा असतो?; काय हाेतात फायदे?

नवी दिल्ली : अभिनेत्री रश्मिका मंदाना तिच्या फिटनेससाठी अनेक प्रकारचे व्यायाम करते आणि ती सोशल मीडियावर तिच्या फिटनेस रुटिनबद्दल स्टोरी किंवा पोस्ट शेअर करते. रश्मिकाच्या वर्कआऊट रुटिनमध्ये रनिंगपासून ते रेझिस्टन्स बँड व्यायामाचा समावेश आहे. त्याचप्रमाणे रश्मिकाला केटलबेल व्यायाम करायलाही आवडते. रश्मिकाने अलीकडेच तिचा एक वर्कआऊट व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती केटलबेल व्यायाम करताना दिसत आहे. हा कोणता व्यायाम प्रकार आहे याबाबत अनेकांना कुतूहल असते.

केटलबेल वर्कआऊट करताना, लोखंडी बॉलच्या मदतीने व्यायाम केला जातो. केटलबॉलचा वापर डंबेलप्रमाणे केला जातो. केटलबेल हा महत्त्वाचा व्यायाम मानला जातो; कारण हा व्यायाम शरीराची ताकद आणि तग धरण्याची क्षमता वाढवण्यासाठी केला जातो. यामुळे तुमच्या शरीराचा गाभा मजबूत होतो. याशिवाय हा व्यायाम करण्याचे इतरही अनेक फायदे आहेत. हे वजन कमी करण्यास आणि शरीराचे वजन राखण्यास मदत करते. खांदे, हात आणि दंड यांचा व्यायाम केला जातो. केटलबेल वर्कआऊट केल्याने शरीराची लवचिकता वाढते. कॅलरी बर्न करण्यासाठी केटलबेल व्यायामदेखील खूप प्रभावी आहेत. म्हणूनच वजन कमी करण्यासाठी वर्कआऊट प्लॅन बनवताना केटलबेल व्यायामाचाही त्यात समावेश करता येईल. यामुळे पाठीचे आणि कंबरेचे स्नायू मजबूत होतात.

केटलबेल करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? फक्त प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली व्यायाम करा. हा एक उच्च-तीव्रतेचा व्यायाम आहे आणि त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. म्हणूनच, जर तुम्ही केटलबेलचा व्यायाम यापूर्वी कधीही केला नसेल किंवा पहिल्यांदाच अशाप्रकारचा व्यायाम करणार असाल, तर हा व्यायाम प्रशिक्षक किंवा तज्ज्ञांच्या देखरेखीखालीच करा. लक्षात ठेवा की, चांगल्या परिणामांसाठी व्यायामासोबतच तुम्ही तुमच्या आहाराकडेही लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे केटलबेलसारखे कठीण व्यायाम सुरू करण्यापूर्वी शरीराच्या पोषणाच्या गरजा लक्षात घेऊन आहार योजना तयार करा. ही योजना बनवण्यासाठी तुमच्या पोषणतज्ज्ञ आणि फिटनेस ट्रेनरची मदत घ्या. उच्च प्रथिने आणि उच्च फायबर आहार उच्च-तीव्रतेच्या वर्कआऊटसह खूप महत्त्वाचे मानले जाते. तुमच्या रोजच्या आहारात संपूर्ण धान्य, हिरव्या भाज्या आणि ताजी फळे यांचा समावेश करा.

Back to top button