कोल्हापूर : मदरशात नेली जाणारी ६९ मुले ‘चाईल्ड वेल्फेअर’कडे सुपूर्द | पुढारी

कोल्हापूर : मदरशात नेली जाणारी ६९ मुले ‘चाईल्ड वेल्फेअर’कडे सुपूर्द

शिरोली एमआयडीसी; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापुरातील रूईकर कॉलनीसमोरील चौकातून आजरा येथील मदरशाकडे मालवाहतूक करणार्‍या ट्रकमधून जाणारी 69 संशयित मुले आढळल्याने खळबळ उडाली. सोशल मीडियावर याबाबत पोस्ट पडू लागल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले. या सर्व मुलांना शिरोली पोलिस ठाण्यात चौकशीसाठी नेऊन त्यांना चाईल्ड वेल्फेअर कमिटीच्या ताब्यात देण्यात आले.

भाजप युवा मोर्चा व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पोलिसांना पाचारण केले. यावेळी हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात जमले होते.

कोल्हापुरातील रूईकर कॉलनीसमोरील चौकात भाजपचे प्रदेश सदस्य विजयेंद्र माने यांना मुस्लिम समाजातील पाच ते तेरा वयोगटातील मुलांना एक व्यक्ती मालवाहतूक करणार्‍या ट्रकमध्ये बसवत असल्याचे दिसले. त्यांनी संबंधित व्यक्तीकडे विचारपूस करताच त्याने पळ काढला. संशय बळावल्याने माने यांनी भाजपच्या अन्य पदाधिकार्‍यांना बोलावून मुलांची चौकशी सुरू केली. यावेळी मुलांकडून वेगवेगळी माहिती मिळत होती. काही जणांनी उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल येथून आल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांच्याकडील रेल्वेचे तिकीट पाहिले असता वेस्ट बंगाल हावडा ते पुणे असा उल्लेख आढळून आला.

कार्यकर्त्यांनी खासदार धनंजय महाडिक यांना सर्व हाकिकत सांगितली. जिल्हा पोलिसप्रमुख शैलेश बलकवडे यांना माहिती देण्यात आली. त्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सर्व मुलांना तत्काळ शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात पाठवले. पोलिसांनी माहिती घेऊन या सर्व मुलांना चाईल्ड वेल्फेअर कमिटीच्या कागल येथील कार्यालयात पाठविले.

शहर पोलिस उपाधीक्षक मंगेश चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या सर्व मुलांच्या कागदपत्रांची तपासणी करून निर्णय घेईन, असे सांगितले. यावेळी भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष विजय खाडे, विवेक वोरा, नितीन मिसाळ, अनिकेत पाटील, अनिकेत मुतगी, बजरंग दलाचे संभाजी साळुंखे यांच्यासह हिंदुत्ववादी आणि भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

आजर्‍यातील दोन मौलवींना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले

आजरा; पुढारी वृत्तसेवा : आजरा शहरात दोन मदरसे आहेत. या मदरशांमध्ये अनेक वर्षांपासून बिहारबरोबरच इतर अनेक शहरांतून मुले धार्मिक शिक्षणासाठी येत असतात. कोल्हापूर येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ही माहिती पुढे आली आहे. कोल्हापूर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर मौलाना शेख व लमतुरे यांना चौकशीसाठी कोल्हापूर पोलिसांनी बोलावले आहे.

ऊर्दू शाळेजवळ एक, तर मदरसा कॉलनीजवळ एक असे शहरात दोन मदरसे आहेत. या ठिकाणी मौलाना फयाज शेख, मौलाना गफार लमतुरे प्रमुख म्हणून काम करतात. हे दोन्ही मदरसे नोंदणीकृत संस्थांमार्फत चालविले जातात. या मदरशांमध्ये बिहारबरोबरच मुंबई, कोल्हापूर, इचलकरंजी, गोवा तसेच अन्य ठिकाणाहून मुले धार्मिक शिक्षणासाठी येत असतात. या मुलांची कागदपत्रे पूर्ण करूनच त्यांना आणले जाते. तसेच आजर्‍याचे सपोनि सुनील हारुगडे यांनी दोन्ही मदरशांना भेटी देऊन चौकशी केली.

अधिक वाचा :

Back to top button