वादळी वार्‍याने केळीच्या बागा जमीनदोस्त; पंचनामे करून भरपाईची मागणी | पुढारी

वादळी वार्‍याने केळीच्या बागा जमीनदोस्त; पंचनामे करून भरपाईची मागणी

कालठण : पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यातील कालठण नंबर 1, कळाशी, गंगावळण, शिरसोडी, पडस्थळ येथे मंगळवारी
(दि. 21) सायंकाळी वादळी वार्‍यासह झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्याने अनेक शेतकर्‍यांच्या केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या; तर आंबा, कांदा, ऊस पिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. यामध्ये शेतकर्‍यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाधित शेतकरी हतबल झाले असून, झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून भरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

इंदापूर तालुक्यातील उजनी धरण पाणलोट क्षेत्रालगतच्या गावात वादळी वार्‍याने थैमान घातले. यात अनेक शेतकर्‍यांच्या केळीच्या बागा अक्षरश: जमीनदोस्त झाल्या. बागांमध्ये सध्या केळी तोडणीचे काम सुरू होते. मात्र, अचानक आलेल्या वादळी वार्‍यासह पावसाने बागांचे प्रचंड नुकसान झाले. पाणीटंचाईच्या काळात देखील मोठ्या कष्टाने पिकवलेली व हाता-तोंडाशी आलेली केळीची बाग डोळ्यांदेखत उद्ध्वस्त झाल्याने अनेक शेतकरी धाय मोकलून रडत होते. केळीबरोबरच कांदा, ऊस उत्पादकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात काढून ठेवलेला कांदा भिजला आहे.

त्याचबरोबर आंब्याच्या कैर्‍या मोठ्या प्रमाणावर झाडावरून पडल्या आहेत, तर ऊसही झोडपला गेला असून, तो आडवा पडला आहे. त्यामुळे महसूल आणि कृषी विभागाने तातडीने नुकसान झालेल्या भागातील पिकांसह बागांचे पंचनामे करावेत. किमान एकरी एक लाख रुपयांची भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे. याशिवाय अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे, विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. घरे, गोठे, पोल्ट्री शेडवरील पत्रे उडून गेले आहेत. सायंकाळपासून वीजपुरवठा गायब झाला आहे. त्यामुळे गावोगावी पाणीपुरवठा करणार्‍या नळ पाणी योजना बंद पडल्या आहेत. रस्त्यावर पडलेली झाडे हटविण्याचे तसेच विजेचे खांब पुन्हा उभे करण्याची कामे रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

हेही वाचा

Back to top button