Abortion pills : अवैधरीत्या गर्भपाताच्या गोळ्या विक्री करणाऱ्या पती-पत्नीला अटक; औषध प्रशासन विभागाची कारवाई | पुढारी

Abortion pills : अवैधरीत्या गर्भपाताच्या गोळ्या विक्री करणाऱ्या पती-पत्नीला अटक; औषध प्रशासन विभागाची कारवाई

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील पाचोड येथील औषध दुकानात पती-पत्नी अवैधरीत्या गर्भपाताच्या गोळ्या विकत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. बुधवारी (दि. १७) अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकून औषध दुकानावर कारवाई करत संबंधित पती-पत्नी विरुद्ध पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पैठण तालुक्यातील पाचोड येथील वैष्णवी मेडिकलवर (औषध दुकानावर) गेल्या अनेक दिवसांपासून गर्भपात गोळ्या व औषधी विक्री करण्यात येत असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली. या औषध विक्री करणाऱ्या मेडिकलची बनावट गिऱ्हाईकाद्वारे खात्री करणयात आली. बुधवारी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित मेडिकलवर छापा मारून गर्भपात साठी वापरण्यात येणाऱ्या विविध कंपनीच्या गोळ्या औषधी पडताळणी केली. त्यानंतर निरिक्षक अंजली मिटकर यांनी पाचोड पोलीस ठाण्याचे सपोनि संतोष माने यांच्याकडे तक्रार या प्रकरणाची तक्रार दिली. त्यानंतर भाग्यश्री रणजित जगताप आणि रणजित जगताप या पती-पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतचा पुढील तपास पैठण विभागाचे डीवायएसपी विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संतोष माने हे करीत आहे.

दरम्यान अन्न व औषध प्रशासन विभागाने पैठण तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विक्रीची मान्यता नसल्याने औषध विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याची चर्चा सुरू असून आठवड्यातून एकदा या औषध विक्री करणाऱ्या दुकानाची झाडझडती गोपनीय पद्धतीने घेण्याची मागणी होत आहे.

Back to top button