बारामती बसस्थानकावरून महिलेचे दीड लाखाचे दागिने लंपास.. | पुढारी

बारामती बसस्थानकावरून महिलेचे दीड लाखाचे दागिने लंपास..

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती एसटी बसस्थानकावरून महिलेच्या पर्समधील 1 लाख 39 हजार रुपयांचे दागिने अज्ञाताने लंपास केले. रविवारी (दि. 19) ही घटना घडली. दरम्यान, या स्थानकावरील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. याबाबत माऊली युवराज गुळवे (रा. टाकळी, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी रविवारी बहीण कल्याणी राजेश भोसले यांना सोडण्यासाठी बारामतीला आले होते.

भोसले यांना येथून जेजुरीला जायचे होते. भोसले यांनी त्यांच्याकडील दागिने पर्समध्ये ठेवले होते. दुपारी तीनच्या सुमारास बसस्थानकावर जेजुरी बस आली. त्या बसमध्ये चढत असताना त्यांना पर्सची चेन उघडी दिसली. त्यांनी पर्स तपासून पाहिली असता त्यामध्ये ठेवलेला 1 लाख 19 हजार रुपयांचे सोन्याचे पावणेदोन तोळ्यांचे गंठण, 18 हजार रुपयांची कानातील फुले तसेच अडीच हजार रुपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याचे दिसून आले. बस आल्यानंतर गर्दीचा फायदा घेत अज्ञाताने पर्समधील हे दागिने लंपास केले.

वाढत्या चोर्‍यांनी प्रवासी हैराण

चोरीची सहावी घटना, तपास शून्य बारामती एसटी बसस्थानक मार्चच्या पहिल्या आठवड्यात नवीन इमारतीत स्थलांतरित झाले. गेल्या दोन महिन्यांत येथे महिलांकडील दागिने जाण्याच्या सहा घटना घडल्या आहेत. परंतु, अद्याप एकाही घटनेचा तपास लागलेला नाही. त्यामुळे बारामती बसस्थानकावरून प्रवास करायचा तर मौल्यवान वस्तूंची काळजी घेणे गरजेचे बनले आहे; अन्यथा मोठा भुर्दंड ठरलेला आहे.

हेही वाचा

Back to top button