Karnataka CM: कर्नाटक मुख्यमंत्रीपदाचा पेच वाढला; शपथविधी सोहळ्याची तयारी थांबवली | पुढारी

Karnataka CM: कर्नाटक मुख्यमंत्रीपदाचा पेच वाढला; शपथविधी सोहळ्याची तयारी थांबवली

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka CM) प्रचंड विजय मिळवणाऱ्या काँग्रेसला अद्यापही मुख्यमंत्रीपदाच्या नावावर शिक्कामोर्तब करता आलेले नाही. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या आणि काँग्रेस प्रदेश अध्यक्ष डी शिवकुमार यांच्याच नावाची चर्चा सुरू आहे. परंतु, काँग्रेस पक्षश्रेष्ठी मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात टाकायची यावर गेल्या चार दिवसांपासून मंथन करीत आहे. तर दुसरीकडे शपथविधी सोहळ्याची तयारी थांबविण्यात आल्याने मुख्यमंत्री पदाचा पेच वाढला आहे. तर पक्षश्रेष्ठी द्विधा मनस्थितीत आहेत.

दरम्यान बुधवारी कर्नाटक कॉंग्रेसचे प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी मुख्यमंत्री निवडीची (Karnataka CM) प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत निर्णय लवकरच कळवला जाईल, असे स्पष्ट केले. मंत्रिमंडळासंबंधी ४८ ते ७२ तासांमध्ये निर्णय घेतला जाईल, असे देखील ते म्हणाले. असे असताना देखील बंगळुरू येथील कांटीरवा स्टेडियम मध्ये शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.

७५ वर्षीय सिद्धारमय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या नावाला सर्वाधिक आमदारांनी पसंती दर्शवली आहे.पक्षश्रेष्ठींकडून त्यामुळे डीके शिवकुमार यांना विश्वासात घेतले जात असल्याचे बोलले जात आहे. राज्यात दोन उपमुख्यमंत्री पदासाठी शिवकुमार यांचा विरोध असल्याचे कळतेय. पंरतु, राज्यात वोक्कालिंगा, लिंगायत आणि दलित समाजातील प्रत्येकी एक उपमुख्यमंत्री बनवण्यासंबंधी पक्षश्रेष्ठी विचारमंथन करीत आहेत.

सिद्धारमय्या मुख्यमंत्री आणि शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री बनवले जाईल. दरम्यान शिवकुमार यांच्या समर्थक आमदारांना कुठले मंत्रालय देण्यात येईल, यासंबंधी देखील चर्चा सुरू आहे.

सोनिया आणि राहुल गांधी यांच्यासोबत जवळपास १ तास चर्चा केल्यानंतर देखील शिवकुमार यांची मनधरणी करण्यात पक्षाला यश आले नसल्याचे कळतेय. कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना मुख्यमंत्री बनवले तर कुठलाही आक्षेप नसल्याचे शिवकुमार यांनी पक्षश्रेष्ठींना सांगितल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान सिद्धारमय्या यांनी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास राहुल गांधी यांची १० जनपथ येथे भेट घेतली. जवळपास एक तास या नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती. यावेळी आमदार देखील उपस्थित होते.या बैठकीनंतर डीके शिवकुमार यांनी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास राहुल यांची भेट घेतली. यापूर्वी पक्षाचे वरिष्ठ नेते केसी वेणुगोपाल यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली होती.

Karnataka CM : सिद्धारमय्या ठरताय उजवे

शिवकुमार यांच्या तुलनेत सिद्धारमय्यांची राज्यातील प्रत्येक समाजात चांगली प्रतिमा आहे. दलित, मुस्लिम तसेच मागासवर्गीयांमध्ये सिद्धारमय्यांची पोहोच आहे.जर त्यांना मुख्यमंत्री बनवले नाही तर एक मोठा ‘व्होटबॅंक’ संपुष्टात येईल अशी भीती कॉंग्रेसला आहे.कुरूबा समाजातून येणारे ओबीसी नेते सिद्धारमय्या यांचा दलित, अल्पसंख्यांक, आदिवासी, ओबीसी समाजात व्यापक जनाधार आहे.

‘अहिंदा फॉर्म्युला’

सिद्धरामय्या गेल्या काही काळापासून अल्पसंख्यातारू (अल्पसंख्यांक), हिंदूलिद्वारू (मागासवर्गीय) आणि दलितारू (दलित) वर्गाच्या फॉर्मुल्यावर काम करीत आहेत. अहिंदा समीकरणानुसार सिद्धरामय्यांनी राज्यातल ६१ टक्के लोकसंख्येवर लक्ष केंद्रित केले होते. त्यांचा हा प्रयोग बराच चर्चेत राहीला. कर्नाटकमध्ये दलित, आदिवासी आणि मुस्लिमांची लोकसंख्या ३९ टक्के आहेत. तर, सिद्धरामय्या यांच्या कुरूबा समाजाची लोकसंख्या ७ टक्क्यांच्या जवळपास आहे. २००९ नंतर काँग्रेसने कर्नाटकमध्ये याच समीकरणाच्या माध्यमातून राज्यातील राजकारणात मजबूत पकड मिळवली आहे.

हेही वाचा 

Back to top button