Jalgaon Murder | जळगाव जिल्ह्यात चाललंय काय? एकाच महिन्यात एका मागून एक सहा खून | पुढारी

Jalgaon Murder | जळगाव जिल्ह्यात चाललंय काय? एकाच महिन्यात एका मागून एक सहा खून

जळगांव पुढारी वृत्तसेवा-  जळगाव जिल्ह्यात मे महिना जसा तापमानाच्या बाबतीत हिट ठरत आहे. तसेच जळगाव जिल्ह्यात मे महिन्याच्या सुरुवातीपासून आज पावेतो विविध घटनांत सहा खून झाले आहेत. यात दि. 22 च्या रात्री शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असलेल्या हॉटेल मध्ये खुनाची घटना झाली. घटनेमागे जुना वाद समोर येत असला तरी अवैध व्यवसायातून खून झाल्याची चर्चा रंगू लागलेली आहे.

जळगाव जिल्ह्यामध्ये जळगावचे तापमान सर्वाधिक उच्चांक ठरत आहे. त्याचप्रमाणे दरोडे, भर दिवसा घरफोड्या, चैन स्नॅचिंग, तेही बस स्थानक जे की जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोरच आहे त्या परिसरात या घटना घडत आहे.  बस स्थानक आवारातून महिलांच्या पर्समधून, सामानांमधून दागिन्यांची चोरी होते. या घटना कमी होण्याचे नाव घेत नाही. अशात खुनाच्या घटना एका मागून एक होत आहे. दि. 22 रोजी कालिका मंदिराजवळ हॉटेल भानूमध्ये रात्री पावणे अकरा वाजेला किशोर सोनवणे नावाच्या युवकाचा खून झाला आहे.  जुन्या वादातून खून झाल्याचे समोर येत आहे.

तर, 7 मे रोजी सुपडू वेलसे याला उधारीचे पैसे द्यायचे सांगून त्याचा खून करण्यात आला. ही घटना भडगाव तालुक्यातील वरखेडा ते पिंपळखेड यादरम्यान असलेल्या दगडाच्या खदानीत झाली होती. याप्रकरणी आरोपी कृणाल उर्फ हितेश चुडामन मराठे याला अटक करण्यात आलेली आहे.

शेताच्या जाण्याच्या रस्त्यावर मुरूम टाकल्याच्या कारणावरून व जुने भांडण याचा वाद निर्माण करून प्रभाकर विनायक पाटील राहणार मालपुर याचा खून करण्यात आला होता. मारवाड पोलिसात 8 आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पाचोरा तालुक्यातील हरेश्वर येथील मंदाबाई दगडू भोई तिच्या बहिणीच्या नातवाने विशाल प्रभाकर भोई याने पत्ते खेळण्यातील झालेले कर्ज फेडण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून आजीचा खून केला होता.

जामनेर तालुक्यातील पळसखेडा येथे राजाराम पवार यांचा मुलगा सुमित पवार दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून वडिलांचा खून केला होता. या प्रकरणी 8 मे ला गुन्हा दाखल झालेला आहे.

5 मे ला रात्री पत्नीवर असलेल्या संशयातून पतीने डोक्यात दगड टाकून तिचा खून केला. यामध्ये भारती गायकवाड यांचा मृत्यू झाला असून पती कैलास गायकवाड याला चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केलेली आहे.

तर दुसरीकडे शिरसोली येथे भर दिवसा चोरट्याने घरफोडी करून पोलिसांना आव्हान दिलेले आहे. तर सराफ बाजारातील भवानी मंदिरासमोर असलेल्या सौरभ ज्वेलर्स या दुकानावर सहा जणांनी रात्री दरोडा टाकून मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने पळविले आहे. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलेले आहे.

जिल्ह्यात अवैध व्यवसायांचा सुळसुळाट

जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध व्यवसायांचा सुळसुळाट दिसून येत आहे. भुसावळ सारख्या जंक्शन स्टेशनला बाजार पेठ पोलिस ठाण्याला अवैध व्यवसायाचा वेढा पडलेला दिसून येत आहे. तोच प्रकार जिल्हा पोलीस कार्यालय असलेल्या जळगाव शहरात तर प्रत्येक गल्लीभोळात आहे. एमआयडीसी भागात याचा तर सुळसुळाट झालेला आहे. नुकतेच राज्य उत्पादन शुल्क विभाग व जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून मोठा नकली दारू बनविण्याचा कारखान्यावर आचारसंहिता काळात कारवाई केली गेली. हा कारखाना एका दिवसात तयार झालेला तर नसेलच ना यावर कारवाई का होत नव्हती असेही प्रश्न उपस्थित होत आहे.

अवैध व्यवसाय व अवैध धंदा करणाऱ्यांवर पाहिजे त्या प्रमाणात पोलिसांच्या वचक राहिलेला नसल्याची जनभावना आहे. त्यापेक्षाही अधिकारी आता सर्वांचे डोळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक पदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वाधिक लक्ष लागून आहे. मुख्यतः यामध्ये जळगाव जिल्ह्यातील चार ते पाच अधिकारी मैदानात उतरलेले आहेत. त्यापैकी काही अधिकार्‍यांनी थेट मंत्रालयाच्या कार्यालयापासून तर त्यांच्या घरापर्यंत वशिला लावण्याची चर्चा ऐकू येत आहे. मात्र एक तारखेला या पदावर कोण बसणार हे कळेल.

हेही वाचा –

Back to top button