शाहूवाडीत कडवी धरणात सर्वाधिक ५१ टक्के पाणीसाठा शिल्लक | पुढारी

शाहूवाडीत कडवी धरणात सर्वाधिक ५१ टक्के पाणीसाठा शिल्लक

विशाळगड : पुढारी वृत्तसेवा : कडवी मध्यम प्रकल्पात ५१ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर अवलंबीत २२ गावांना टंचाई जाणवणार नाही. सध्या धरणातून १२० क्यूसेस पाण्याचा विसर्ग कडवी नदीपात्रात विद्युत गृहहातून सुरू आहे. सध्यातरी पाणी उपसाबंदी करण्यात आलेली नाही. सुयोग्य व्यवस्थापनामुळेच पावसाळ्यापूर्वी प्रकल्पात ४० टक्के पाणीसाठा शिल्लक राहणार असल्याचे पाटबंधारे विभागाकडून माहिती देण्यात आली आहे.

शाहूवाडी तालुक्याच्या पश्चिम भागात निसर्गाच्या सान्निध्यात असलेले आणि बहुतांशी कोरडवाहू क्षेत्रासाठी वरदान ठरलेल्या कडवी धरणाची २.५१ टीएमसी क्षमता आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास पाणीपातळी ६०१.२५ मिटर तर पाणीसाठा ७१.२४ दलघमी असतो. यंदा कडवी मध्यम प्रकल्पात १.२८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी याच काळात १.०९ टीएमसी पाणीसाठा होता. परळे-निनाई ते पाटणे बंधारा दरम्यानच्या २२ गावांतील लाभक्षेत्राला सिंचन व पाणी पिण्यासाठी महिन्याकाठी दहा टक्के पाणी लागते.

तालुक्याच्या पश्चिमेकडील पालेश्वर, कासार्डे व मानोली या अन्य तीन लघू पाटबंधारे तलावातही सरासरी ५० टक्केहुन अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. पाटबंधारे विभागाने कडवी नदीवर सुतारवाडी, वालूर, भोसलेवाडी, येलूर, कोपार्डे, शिरगाव, सवते-सावर्डे, पाटणे अशा आठ ठिकाणी पाणी साठवणुकीसाठी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे उभे केले आहेत.

भेंडवडे, परळे-निनाई, पुसार्ळे, आळतूर, करूंगळे, लोळाणे, निळे, वालूर, कडवे, येलूर, पेरीड, मलकापूर, गाडेवाडी, कोपार्डे, शिरगांव, सांबू, मोळवडे, सावर्डे, सवते, सावे, पाटणे व शिंपे अशी एकूण २२ गावे या कडवी प्रकल्पावर अवलंबून आहेत. शिवाय वारणा नदीवरील सावर्डे धरणाच्या बॅकवॉटरवर अवलंबून असणाऱ्या सरूड, चरण, थेरगाव या गावांनाही ‘कडवी’च्या नैसर्गिक पाणी प्रवाहाचा लाभ होतो.

जिल्ह्यातील धरणाची स्थिती :

धरण     पाणीपातळी     पाणीसाठा(दलघमी)    उपयुक्त(दलघमी)    टीएमसी   टक्के 
राधानगरी      ५८१.१९         १०४.८७                ८८.०५               ३.११     ४०.०३
तुलसी           ६०६.२६            ५०.०५               ४३.६८               १.५४     ४७.५२
वारणा           ६११.००         ५८१.५२              ३८६.६८            १३.६५     ४९.६२
दुधगंगा          ६२५.६५         २००.५१              १६०.५०              ५.६७     २३.६३ 
कासारी          ६१२.२०          ३२.६२                  ३२.०२              १.१३    ४१.०७  
कडवी            ५९२.८५          ३६.७६                  ३६.१६              १.२८    ५१.२४
कुंभी              ६०३.४५          ४२.५७                  ४२.१९              १.४९    ५५.१५
पाटगांव          ६१७.३४          ४०.१३                  ३९.६६               १.४०    ३७.८५

-हेही वाचा 

रमजाननिमित्त वाढली खाद्यपदार्थांची गोडी

न्यायालयीन वादात अडकले खडकवासल्याचे होर्डिंग

न्यायालयीन वादात अडकले खडकवासल्याचे होर्डिंग

 

 

Back to top button