रमजाननिमित्त वाढली खाद्यपदार्थांची गोडी | पुढारी

रमजाननिमित्त वाढली खाद्यपदार्थांची गोडी

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  मुस्लिम बांधवांसाठी पवित्र असलेला रमजान महिना अंतिम टप्प्यात असून, मुस्लिम बांधवांसह सर्वधर्मीय खवय्ये खाद्यपदार्थांसाठी गर्दी करीत आहेत. अफगाणी लेग, दालचा खाना, कबाब, लखनवी पुलाव, शाही तुकडा, चिकन-मटण बिर्याणी, अशा पदार्थांना ग्राहकांची विशेष पसंती आहे. यातही दालचा खाना आणि गोड पदार्थांत शाही तुकड्याला पसंती आहे, असे इमदादीचे सदस्य अजीज बागवान यांनी सांगितले.

पवित्र रमजान महिन्यात बाजारपेठेत मिठाई, सुका मेवा, फळे, खजूर यांची खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. विशेष अकरा महिने प्रतीक्षा केल्यानंतर खाद्यपदार्थांची प्रतीक्षा संपते. गेल्या तीन वर्षांपासून कोरोनामुळे अनेक निर्बंध होते. परंतु, यंदा पूर्णपणे निर्बंधमुक्त रमजान महिना सुरू आहे. त्यामुळे रमजाननिमित्त एक महिन्यासाठी खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले जातात. त्याठिकाणी खवय्यांची गर्दी होत असल्याचे चित्र आहे. शहरातील मोमीनपुरा आणि कॅम्प भागात मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांचे स्टॉल लागत होते. परंतु, गेल्या वर्षात या भागातून कोंढवा परिसरात झालेल्या स्थलांतरामुळे कोंढव्यातील कैसरबाग, मिठानगर, युनिटी पार्क परिसरात मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांचे स्टॉल लागत आहेत.

अजीज बागवान म्हणाले, इमदादी या ग्रुपच्या वतीने गेल्या 37 वर्षांपासून पूर्वी मोमीनपुरा आता कॅम्प परिसरात रमजान महिन्यात खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले जातात. आमच्या ग्रुपमधील सदस्य हे विनामोबदला काम करतात. या व्यवसायातून येणारा नफा हा गरीब व गरजू मुलांचे शिक्षण आणि वैद्यकीय कारणांसाठी मदत केली जाते. सामाजिक दायित्वामुळे ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळतो, असे ते म्हणाले.

कोणत्या पदार्थांना आहे मागणी?

अनेक पदार्थ केवळ रमजान महिन्यात तयार केले जातात. रमजान महिन्याची मुस्लिम बांधवच नाही, तर खाद्यपदार्थांची सर्वच समाजांतील नागरिक वाट पाहत असतात. तंदुरी, कडई तंदुरी, दालचा राईस, चिकन बिर्याणी, मुर्ग मुसल्लम या पदार्थांना सर्वाधिक मागणी आहे. त्यामुळे हे पदार्थ चविष्ट होतील, याकडे विशेष लक्ष दिले जाते.

या भागात आहेत स्टॉल
कोंढवा परिसरातील कौसरबाग, युनिटी पार्क, बाबाजान दर्गा, कॅम्प परिसर, मोमीनपुरा या भागांत चविष्ट खाद्यपदार्थ मिळतात. जेवणानंतर खवय्यांचे पाय वळतात ते काश्मिरी सबरताकडे.

ऑर्डरप्रमाणेही मिळतात पदार्थ
रमजान महिन्यात खाद्यपदार्थांची रेलचेल असते. मोठ्या प्रमाणात स्टॉल लावले जातात. त्या ठिकाणी होणारी गर्दी पाहून इच्छा असूनही ते स्टॉलवर जात नाहीत. परंतु, पार्सलची सोय असून, ऑर्डरप्रमाणेही खाद्यपदार्थ तयार करून दिले जातात.

Back to top button