न्यायालयीन वादात अडकले खडकवासल्याचे होर्डिंग | पुढारी

न्यायालयीन वादात अडकले खडकवासल्याचे होर्डिंग

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : खडकवासला जलसंपदा विभागाच्या मुठा कालव्यासह मालकीच्या जागेतील होर्डिंग अनेक वर्षांपासून न्यायालयीन वादात अडकले आहेत. दुसरीकडे नांदेड फाटा, वडगाव फाटा आदी ठिकाणी धोकादायक होर्डिंगमुळे दुर्घटनांची टांगती तलवार उभी आहे. जलसंपदा विभागाच्या मालकी जागेतील होर्डिंगला महापालिकेने परवानगी दिली आहे. 2018 मध्ये जलसंपदा विभागाने होर्डिंगची परवानगी रद्द केली, त्याविरोधात होर्डिंगमालकांनी न्यायालयात धाव घेतली. जलसंपदा विभागाने याबाबत प्रतिज्ञापत्रही सादर केले आहे.

खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता मोहन बदाणे म्हणाले की, मुठा कालवा व जलसंपदा विभागाच्या मालकी जागेतील होर्डिंगची परवानगी खात्याने रद्द केली आहे. मात्र, न्यायप्रविष्ट बाब असल्याने होर्डिंगवर कारवाई करता येत नाही. खडकवासला धरणापासून वाहणारा मुठा कालवा मुख्य सिंहगड रस्त्यालगत आहे. नांदेड, वडगाव, धायरी, हिंगणेपासून थेट पुण्यापर्यंत कालव्याच्या तीरावर होर्डिंग उभे आहेत. सिंहगड रोड परिसरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांवरील इमारती महाकाय होर्डिंगच्या विळख्यात आहेत.

परवानगी दिलेल्या होर्डिंगची पाहणी करून तपासणी करण्यात येत आहे. बेकायदेशीर होर्डिंगविरोधात कारवाई करून असे होर्डिंग काढण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.
                            – प्रदीप आव्हाड, सहायक आयुक्त, सिंहगड रोड विभाग

Back to top button