व्हिडिओ व्हायरल झाला अन् चोरलेली गाय दारात | पुढारी

व्हिडिओ व्हायरल झाला अन् चोरलेली गाय दारात

चिचोंडी पाटील : पुढारी वृत्तसेवा :  नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे आठवड्यापूर्वी एका शेतकर्‍याची गाय चोरीस गेली होती. मात्र, हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाल्यानंतर, त्याचे फुटेज ग्रामपंचायतीकडून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. हे फुटेज पाहून चोरट्यांनी शुक्रवारी सकाळी ती गाय पुन्हा चिचोंडी पाटील शिवारात आणून बांधली. सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना न्याय मिळाल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून चिचोंडी पाटील येथे चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून, सोयाबीन, तसेच जनावरे, दुचाकी अशा अनेक चोर्‍या सध्या चिचोंडी पाटील येथे घडत असतानाही नगर तालुका पोलिसांचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. चिचोंडी पाटील हे नगर तालुक्यातील बाजारपेठेचे गाव आहे. त्यामुळे येथे नेहमीच लोकांची वर्दळ असते. गावातील बंद पडलेली पोलिस चौकी पुन्हा सुरू करण्यासाठी सरपंच शरद पवार यांनी पोलिस अधिकार्‍यांना लेखी देऊनही, या पोलिस चौकीचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.

संबंधित बातम्या :

गेल्या आठवड्यात सोयाबीनच्या गोण्या चोरतानाही चोरट्यांना ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, पोलिसांचा वचक नसणे ही बाब गंभीर असून, यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
अनेक वर्षापासून चिचोंडी पाटील येथील पोलिस चौकी बंदच असून, तिची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. पोलिस चौकीसाठी ग्रामपंचायतीचा जागा उपलब्ध करून देण्यास तयार असून, वरिष्ठांनी याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांनी केली आहे. मागील काही दिवसांपूर्वी गावात दुचाक्या चोर्‍यांचे सत्र सुरू असून, चोरट्यांचा तपास पोलिसांना लागत नसल्याने चोरीची तक्रार दिली जात नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी दाद मागायची कुठे? असा प्रश्न विचारला जात आहे.

जिल्हा बदलला की थंडावतो तपास
मागील अनेक वर्षांपासून बीड जिल्ह्यातील अनेक चोरट्यांनी नगर तालुक्यात चोर्‍या केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. मात्र, जिल्हा बदलल्यानंतर स्थानिक पोलिस ठाणे किंवा तपासी पोलिस अंमलदार याकडे दुर्लक्ष करत असल्याने नगर तालुक्यातील गुन्हेगारीमध्ये वाढ होत चालली आहे.

Back to top button