Pune News : हत्ती तलावाचे सौंदर्यीकरण रखडले | पुढारी

Pune News : हत्ती तलावाचे सौंदर्यीकरण रखडले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील हत्ती तलाव पुनरुज्जीवन आणि सौंदर्यीकरण प्रकल्प रखडला असून, भूमिपूजनाच्या दीड वर्षानंतरही प्रकल्प अर्धवट अवस्थेत आहे. याचाच फायदा काही व्यक्तींकडून घेण्यात येत आहे. या व्यक्ती रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत तलावाच्या ठिकाणची जागा दारू पिण्यासाठी आणि मोकळ्या जागेत पार्ट्या करण्यासाठी वापरत आहेत. माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते हत्ती तलाव पुनरुज्जीवन आणि सोंदर्यीकरणाचा प्रारंभ 22 एप्रिल 2022 रोजी करण्यात आला. हे काम कर्वे समाजसेवा संस्था आणि कमिन्स इंडिया फाउंडेशनच्या माध्यमातून पूर्ण होणार होते.

त्यानुसार कामाला सुरुवात झाली आणि काही काम पूर्णही झाले. मात्र, अजूनही प्रकल्पाचे काम अर्धवट अवस्थेत असल्याचे दिसत आहे. या परिसरात खोदकाम आणि बगिच्याचे प्राथमिक स्वरूपातील काम पूर्ण झाले आहे. या परिसरात काही कामे सुरू असल्याने राडारोडा विखुरलेल्या अवस्थेत आहे. या परिस्थितीचा फायदा घेत काही व्यक्ती दररोज रात्री मद्यपान करीत असून, परिसर घाण करीत आहेत. या परिसराच्या आजूबाजूला एनसीसीएसचे कार्यालय, कॉलनी आणि विद्यापीठातील सेवक वसाहतीच्या इमारती आहेत. या संपूर्ण प्रकाराकडे पुणे विद्यापीठात सकाळी आणि सायंकाळी फिरायला येणार्‍या नागरिकांनीही लक्ष वेधले आहे. हे काम कधीपर्यंत पूर्ण होणार? अशी विचारणा केली आहे.

वृक्षारोपण केलेल्या झाडांकडेही दुर्लक्ष

या परिसरातच विद्यापीठाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत 75 झाडे लावण्यात आली. मात्र, या झाडांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ही झाडे सुकत असल्याचे चित्र आहे. या झाडांना कोणतेही सुरक्षा कम्पाउंड नाही, त्यामुळे विद्यापीठाने या झाडांकडे वेळीच लक्ष न दिल्यास झाडे मरतील, असे चित्र निर्माण झाले आहे.

प्रकल्पात काय होणार होते..?

या संपूर्ण परिसराचे सौंदर्यीकरण होणे अपेक्षित होते. या परिसरातच नक्षत्र उद्यानाची निर्मिती होणार होती. त्याचप्रमाणे कारंजी उभारण्यात येणार होती. फिरण्यासाठी प्रशस्त ट्रॅक निर्माण करण्यात येणार होते. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. हा प्रकल्प तातडीने पूर्ण न झाल्यास हत्ती तलावही जीर्णावस्थेत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Back to top button