निंबळक ग्रामस्थ आक्रमक! बायपास रस्त्याचे काम पाडले बंद | पुढारी

निंबळक ग्रामस्थ आक्रमक! बायपास रस्त्याचे काम पाडले बंद

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा :  बाह्यवळण रस्त्यावरील निंबळक परिसरातील विविध वस्त्यांवर जाण्यासाठी भुयारी मार्ग बनवावा, या मागणीसाठी निंबळक ग्रामस्थांनी आक्रमक होत ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ खांदवे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि. 15) रस्त्याचे काम बंद पाडले. अधिकार्‍यांच्या आश्वासनानंतर काम पूर्ववत सुरू करण्यात आले. निंबळक ग्रामपंचायतीच्या वतीने राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांना सरपंच प्रियंका लामखडे व ग्रामपंचायत सदस्यांनी निवेदन देऊन भुयारी मार्गाची मागणी केली.

संबधित बातमी :

निंबळक गावाजवळील कळसेवस्ती, पाडळी वस्ती, शिंदे वस्ती, जिजाऊनगर, साईनगर, उमाप वस्ती तसेच कांबळे वस्तीवरील रस्ता बाह्यवळण रस्त्याला येऊन मिळत आहे. सदर वस्त्यांवर सुमारे 200 घरे असून, दोन ते अडीच हजार लोकसंख्या आहे. येथील नागरिक, विद्यार्थी, कामगार, शेतकरी, दूध व्यावसायिकांच्या रस्त्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी भुयारी मार्ग बनविण्याची मागणी करण्यात आली. रस्त्याअभावी नागरिकांची परवड होत असून, भुयारी मार्ग होणे गरजेचे आहे, अशा मागण्या करत भुयारी मार्गासाठी शुक्रवारी बाह्यवळण रस्त्याचे काम बंद पाडण्यात आले. त्यानंतर अधिकार्‍यांनी आश्वासन दिल्यानंतर काम सुरू करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ खांदवे, दीपक पंडित, अशोक घोलप, जालिंदर जाजगे यांच्यासह निंबळक ग्रामस्थ उपस्थित होते.

बोल्हेगावप्रमाणे येथे भुयारी मार्ग होण्याची गरज आहे. जेणेकरून वस्त्यांवरील नागरिक व विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होईल.
                                           – सोमनाथ खांदवे, ग्रामपंचायत सदस्य, निंबळक 

हेही वाचा :

Back to top button