ऑनर किलींग प्रकरणी खून खटल्यात आई-मुलास जन्मठेप | पुढारी

ऑनर किलींग प्रकरणी खून खटल्यात आई-मुलास जन्मठेप

वैजापूर, पुढारी वृत्तसेवा : मुलीने प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून मुलीच्या घरात घुसून कोयत्याने मुलीचा खून करून तिचे शीर धडावेगळे करणाऱ्या आई आणि भावाला वैजापूर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही हृदय पिळून टाकणारी घटना 5 डिसेंबर २०२१ मध्ये घडली होती. या घटनेत किशोरी उर्फ कीर्ती अविनाश थोरे या तरुणीचा खून करण्यात आला होता. वैजापूर तालुक्यातील लाडगावात ही घटना घडली होती.

शोभा संजय मोटे आणि संकेत संजय मोटे असे शिक्षा झालेल्या आई व मुलाचे नाव आहे. शोभा मोटे हिला जन्मठेप व एक हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच मुलगा संकेत संजय मोटे यास जन्मठेप व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास पाच वर्ष शिक्षा व पाचशे रुपये दंड व दंड न भरल्यास पंधरा दिवस कारावास, याशिवाय बाल गुन्हेगार कायद्यानुसार संकेत यास वयाच्या २१ वर्ष होईपर्यंत बाल सुधारगृहात ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायादीश एम मोहि्योद्दीन एम ए. यांनी शनिवारी या खटल्याचा निकाल दिला.

वीरगाव पोलीस ठाण्यात फिर्यादी अविनाश संजय थोरे यांच्या तक्रारीवरून शोभा मोटे आणि संकेत मोटे यांच्या विरुद्ध खुनाचे प्रकरण दाखल झाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय नरवाडे, पोलीस नाईक किशोर आघाडे यांनी तपासकाम करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.

सुनावणीच्या वेळी सरकारी पक्षातर्फे सहाय्यक नऊ जणांच्या साक्ष नोंदवल्या. सरकारी पक्षाने आरोप सिद्ध केल्याने न्यायालयाने आई व मुलाला शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे बाळासाहेब महेर यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी सतीश गायकवाड आणि विठ्ठल जाधव यांनी सहकार्य केले.

काय होते प्रकरण?

वैजापूर तालुक्यातील गोयगाव येथील रहिवासी किशोरी उर्फ किर्ती (वय.19) हिने लाडगाव येथील अविनाश संजय थोरे (वय.23) यांच्याशी जुन 2021 मध्ये आळंदी येथे प्रेमविवाह केला होता. या विवाहाला किशोरीच्या घरच्यांचा विरोध होता. किशोरीच्या काटा काढण्याचा कट तिची आई शोभा व भाऊ संकेत यांनी रचला. 5 डिसेंबर 2021 रोजी अविनाश व‌ किशोरी हे नवदांपत्य लाडगाव शिवारात इट क्रमांक 307 मध्ये असतांना आरोपी शोभा व संकेत हे तिथे गेले.‌ किचनमध्ये शोभा हिने किशोरीचे पाय धरले व संकेत याने तिच्या गळ्यावर कोयत्याने सपासप वार केले व तिचे शीर धडावेगळे केले. त्यानंतर बाहेर येऊन त्याने किशोरीचे शीर हातात घेऊन मोबाईलने सेल्फी काढला.

हेही वाचा :

Back to top button