छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दुष्काळसद़ृश परिस्थिती, अनुशेष आणि मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरात तब्बल सात वर्षांनंतर शनिवारी (दि. 16) राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. मराठवाड्याला मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने राज्य शासनाकडून आरोग्य, शिक्षण, दळणवळण, सिंचन, शेती आणि उद्योगासाठी 40 हजार कोटींच्या पॅकेजचे गिफ्ट मिळण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
दुष्काळात होरपळत असलेल्या मराठवाड्यातील बळीराजासाठीही विशेष पॅकेज जाहीर केले जाऊ शकते, अशी माहिती शुक्रवारी सूत्रांनी दिली. राज्यातील इतर विभागांच्या तुलनेत मराठवाड्याचा मोठा अनुशेष आहे. सातत्याने या दुष्काळग्रस्त विभागाकडे शासनाकडून दुर्लक्ष होत आले आहे. मराठवाड्याचा सिंचनाचा प्रश्न कायम आहे. औद्योगिक विकासही मंदावला आहे. यंदा पावसाअभावी पुन्हा एकदा मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट ओढावले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत असल्याने या बैठकीकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.
बैठकीस 29 मंत्री येणार
सात वर्षांनंतर होत असलेल्या बैठकीसाठी 29 मंत्री येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सत्ताधारी पक्षातील मंत्री येणार आहेत. यांच्यासह 39 सचिव, स्वीय सहायक आणि विशेष अधिकारी दाखल होणार आहेत. त्यांच्या सुरक्षेच्या द़ृष्टिकोनातून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे; तर सुमारे 400 शासकीय अधिकारी आणि 350 वाहनांचा ताफा असणार आहे.
40 हजार कोटींचे प्रस्ताव
मराठवाडा विभागातील विविध विभागांकडून मागण्यांचे 40 हजार कोटी रुपयांचे प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आले आहेत. यात आरोग्य, सिंचन, शेती, दळणवळण, उद्योग यासह अन्य विभागांचे प्रस्ताव आहेत; तर गोदावरी विकास महामंडळाचा 13 हजार 500 कोटी रुपयांचा प्रस्ताव असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
वेळेच्या नियोजनाअभावी अमित शहांचा दौरा रद्द : अजित पवार
दरम्यान, मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा छत्रपती संभाजीनगरमध्ये येणार होते. त्यांच्या या दौर्यासाठी प्रशासकीय पातळीवरील सर्व तयारी पूर्ण झाली होती. मात्र, वेळेचे नियोजन होत नसल्यामुळे त्यांचा दौरा रद्द झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
दुष्काळ जाहीर होणार?
मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट आहे. शेतकर्यांच्या आत्महत्यादेखील गेल्या आठ महिन्यांत वाढल्या आहेत. पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजादेखील हैराण आहे. या अनुषंगाने राज्य शासन मराठवाड्यात दुष्काळ किंवा दुष्काळसद़ृश जाहीर करण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.